तानाजी सावंत यांचा पारा चढला; म्हणाले,”मी काय तुम्हाला अंगठाछाप मंत्री वाटलो का?,इतका वेडा आहे का?”

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना हाफकिन नावाच्या माणसाकडून औषध घेणं बंद करा असा सल्ला दिल्याचा दावा आहे. त्यांचे हे वाक्य सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रांमध्येही यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यावरुन तानाजी सावंत यांचा पारा चांगलाच चढला आहे. यावेळी त्यानी टीका करणाऱ्यांना उत्तर देत “तुम्हाला मी काय अंगठाछाप मंत्री दिसतो का? असा सवाल विचारला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना, “हा सगळा मूर्खपणा आहे. मीडियाला किंवा इतरांना हे नवं सरकार आल्याचं पचत नाही आहे. तुम्हाला सर्वांना माझं शिक्षण माहिती आहे ना? उगाच ११-१२ वीचा पोरगा म्हणून ही दांडकी (मीडियाचे बूम) घेऊन फिरत नाही आहे. मी उच्चशिक्षित आहे. एकदा मी किती संस्था चालवतो, किती कारखाने चालवतो, किती कर्मचारी आहेत, किती दर्जेदार आहेत याची माहिती घ्या. मी काय तुम्हाला अंगठाछाप मंत्री वाटलो का?,” अशी विचारणा तानाजी सावंत यांनी केली आहे.
“म्हणजे मला कळतच नाही, मी मी कुठे बोललो हे दाखवून द्या. हाफकिन माणसाकडून औषधं घ्यायची नाही असे म्हणालो असेल तर आत्ता राजीनामा देऊन टाकेन,” असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नुकतीच ससून रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांचीही भेट घेतली. तानाजी सावंत यांनी यावेळी डॉक्टरांना अनेक प्रश्न विचारले. रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित झाला असता, हाफकिनकडून वेळेत औषधं मिळत नसल्याची तक्रार डॉक्टरांनी केली. त्यावर तानाजी सावंत यांनी, ‘तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधे घेता ते बंद करा’ असं म्हटलं. यानंतर पीएने त्यांना हाफकीन शासकीय संस्था असल्याचे सांगत सारवासारव केली असा दावा आहे.





