Tamil Nadu : विधानसभेत अभूतपूर्व नाट्य; राज्यपालांवरून सुरू झाले पोस्टरवॉर

चेन्नई – तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांच्या वॉकआऊटमुळे सोमवारी त्या राज्याच्या विधानसभेने अभूतपूर्व नाट्य अनुभवले. त्यानंतर मंगळवारी तमिळनाडूत पोस्टरवॉरला तोंड फुटले. सत्ताधारी द्रमुक आणि मित्रपक्षांनी रवी यांच्या विरोधात, तर भाजपने रवी यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावली.
तमिळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वाखालील सरकार आणि रवी यांच्यात वारंवार संघर्षाच्या ठिणग्या पडत आहेत. त्या संघर्षाचा नवा अंक विधानसभेत पाहावयास मिळाला. विधानसभा अधिवेशनाच्या प्रारंभी रवी यांचे अभिभाषण झाले.
राज्य सरकारकडून तयार करण्यात आलेल्या अभिभाषणातील काही भाग रवी यांनी वगळला. त्यावरून मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/maharashtra-top-in-the-country-in-giving-landless-beneficiaries-a-place-for-a-house-rural-development-minister-girish-mahajan/
रवी यांचे अभिभाषण प्रथेला सोडून होते असे नमूद करणारा ठराव स्टॅलिन यांनी मांडला. ते बोलत असताना रवी विधानसभेतून बाहेर पडले. त्या घडामोडींनंतर तमिळनाडूतील राजकारण तापले आहे. त्यातून सत्ताधाऱ्यांनी गेट आऊट रवी असा उल्लेख असणारी पोस्टर्स अनेक ठिकाणी लावली. तर, भाजपने रवी यांची प्रशंसा करणारी पोस्टर्स झळकावली.





