Tamil nadu election 2026: थलपती विजयने 30 वर्षांपासून सोबत असलेल्या ड्रायव्हरच्या मुलाला दिली उमेदवारी; भावूक व्हिडिओ व्हायरल
Tamil nadu election 2026 : सोमवारी (३० मार्च) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समर्थकांना संबोधित करताना विजय यांनी सत्ताधारी DMK सरकारवर जोरदार टीका केली.

Tamil nadu election 2026: दाक्षिणात्य सुपरस्टार आणि ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) पक्षाचे अध्यक्ष विजय यांनी राजकारणात एन्ट्री करताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी विजय यांनी सर्व २३४ जागांवर उमेदवार जाहीर केले असून, यामध्ये एका नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे. विजय यांनी त्यांचे जुने सहकारी आणि माजी ड्रायव्हर राजेंद्रन यांचा मुलगा शबरिनाथन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
भर मंचावर बाप-लेक ढसाढसा रडले –
शबरिनाथन यांना ‘विरुगम्बाक्कम’ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होताच, मंचावर एकच भावनिक वातावरण निर्माण झाले. आपल्या नेत्याने दाखवलेला हा विश्वास पाहून शबरिनाथन यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी विजय यांचे पाय धरले आणि त्यांना मिठी मारली. हे पाहून त्यांचे वडील राजेंद्रन यांनाही रडू कोसळले. यावेळी सुपरस्टार विजय स्वतः भावूक झाले आणि त्यांनी पुढे होऊन शबरिनाथन यांचे अश्रू पुसले. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
३० वर्षांची निष्ठा आणि ‘शिट्टी’ क्रांती –
राजेंद्रन हे गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ विजय यांच्यासोबत आहेत. त्यांनी सुरुवातीला ड्रायव्हर म्हणून काम केले आणि सध्या ते विजय यांचे वैयक्तिक सहाय्यक (PA) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. शबरिनाथन हे गेल्या अनेक वर्षांपासून विजय यांच्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. गेल्या वर्षी त्यांची जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विजय यांनी आपल्या ‘शिट्टी’ या चिन्हाला पाठिंबा देण्याचे आवाहन करत, या लढाईला ‘शिट्टी क्रांती’ असे नाव दिले आहे.
#ThalapathyVijay’s personal car driver, Rajendran, has been working with Vijay for over 30 years. His son, Sabarinathan, was part of Virugambakkam VMI and has been involved in several welfare activities since the early stages of the fan club itself.
He was appointed as the #TVK… https://t.co/nOCb1RzkGn pic.twitter.com/m7HV0jZlSA
— Movies Singapore (@MoviesSingapore) March 29, 2026
मुख्यमंत्री स्टालिन यांच्या सरकारवर हल्लाबोल –
सोमवारी (३० मार्च) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समर्थकांना संबोधित करताना विजय यांनी सत्ताधारी DMK सरकारवर जोरदार टीका केली. तामिळनाडूतील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “ही तामिळनाडूला वाचवण्याची लढाई आहे,” असे म्हणत त्यांनी भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अपयशावरून मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांना लक्ष्य केले.
अभिनयाकडून राजकारणाकडे –
फेब्रुवारी २०२४ मध्ये राजकारणात येण्याचा निर्णय घेणाऱ्या विजय यांनी ‘द गोट’ हा आपला शेवटचा चित्रपट असेल असे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी एच. विनोद यांचा ‘जन नायकन’ हा चित्रपट साइन केला आहे, ज्याला अद्याप सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. आगामी २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात विजय यांचा हा ‘सर्वसामान्यांना संधी’ देण्याचा पॅटर्न किती यशस्वी ठरतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.





