Crime news : ताम्हिणी घाटातील अनोळखी महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले; पिंपरी-चिंचवडमधून दोघे ताब्यात
Crime news : ताम्हिणी घाटात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याच्या प्रकरणाचा रायगड पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे छडा लावला. दोघांना पिंपरी-चिंचवडमधून ताब्यात घेतले.

Crime news : ताम्हिणी घाट परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याच्या प्रकरणाचा रायगड पोलिसांनी छडा लावला आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दोघांना पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेतले. दुर्गाप्रसाद मंगालप्रसाद प्रजापती (वय २४) आणि दिनेशकुमार विश्राम प्रजापती (वय २६) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
२५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३५ वाजता माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताम्हिणी घाट परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपासादरम्यान या प्रकरणात गुन्हा क्र. २४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड आणि माणगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. तपासात करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणातून दुर्गाप्रसाद प्रजापती आणि दिनेशकुमार प्रजापती यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोघांना पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासात आरोपींनी गुन्ह्याबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच गुन्ह्यात दिनेशकुमार प्रजापती याच्या मालकीची स्विफ्ट डिझायर कार (MH-12-FY-5136) वापरण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत सपोनि मानसिंग पाटील, पोलीस हवालदार रविंद्र मुंढे, प्रतिक सावंत, रणजितसिंह खराडे, अक्षय पाटील, प्रदीप खरात आणि सायबर सेलचे तुषार घरत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे अवघ्या काही तासांत आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आल्याने तपास पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.





