अभिनेत्री तमन्ना भाटीयाची ईडीकडून चौकशी; नेमकं काय आहे प्रकरण ?

Tamannaah Bhatia | बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाची ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी तमन्नाला ईडीने समन्स धाडले होते. त्यानंतर तमन्नाची गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. अभिनेत्री तमन्ना तिच्या आईसह ईडी कार्यालयात पोहचली होती. नंतर काही तास तिची चौकशी सुरु होती.
फेअर प्ले नावाच्या अॅपचे प्रमोशन केल्याचा आरोप
फेअर प्ले नावाचे अॅप आहे याचे प्रमोशन केल्याचा आरोप तमन्नावर आहे. हे अॅप महादेव बेटिंग अॅपशी संबंधित आहे. ऑनलाईन गेममध्ये अनेक लोक पैशांची गुंतवणूक करतात. महादेव बेटिंग ॲपचे सहाय्यक ॲप Fair Play वर आयपीएल सामन्यांना प्रमोट केल्याप्रकरणी तमन्नाची चौकशी केली आहे.
या अॅपवर मनोरंजन क्षेत्र, क्रिकेट, पोकर, बॅडमिंटन, कार्ड गेम्स, फुटबॉल या सगळ्यासाठी बेटिंग करता येते. या अॅपचे प्रमोशन केल्याने तमन्ना चर्चेत आली. त्यामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात आत्तापर्यंत रणबीर कपूर, श्रद्धा कपूर यांनाही समन्स पाठवले गेले होते. तसेच या प्रकरणात गेल्या वर्षी कपिल शर्माचीही चौकशी झाली होती. या सगळ्यानंतर आता तमन्ना भाटियाच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत ईडीने एकूण ४९० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त केल्याचीही माहिती आहे. हे एक बेटिंग अॅप आहे. त्यात अनेक प्रकारचे गेम्स आहेत ज्यावर सट्टा लावता येतो.
समोर आलेल्या माहितीनुसार, या महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून ५७ हजार रुपये गुंतवल्यास रोज ४ हजार रुपये मिळतील असे आमीष लोकांना दाखवण्यात आले आहे. घोटाळा करण्यासाठी शेल कंपन्यांच्या नावे बनावट अकाऊंट तयार करण्यात आली आहे. लोकांनी गुंतवलेले पैसे क्रिप्टो करन्सी आणि बिटकॉईन्समध्ये गुंतवण्यात आले आहेत अशीही माहिती समोर आली आहे.
तमन्नाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिने अधिक काम केले आहे. ‘बाहुबली’सह तिने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काही वेबसीरिजमध्येही काम केले आहे.





