नेवाशात नव्या-जुन्यांसह माजी आ. मुरकुटे समर्थकांत चुरस
आज भाजपच्या नेवासा तालुकाध्यक्ष निवडीची शक्यता
नेवासा (प्रतिनिधी) – भाजपाच्या तालुकाध्यक्ष निवडीसाठी आज इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र भाजप अंतर्गत ओढताणीने तालुकाध्यक्ष निवडीचा चेंडू जिल्ह्याच्या कोर्टात गेला आहे. उद्या (दि. 23) नगर येथून ही निवड जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज भाजपचे कुंदन भंडारी, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, माजी तालुकाध्यक्ष संजय शिंदे, लक्ष्मण मोहिते, अशोक टेकणे, अंकुश काळे, प्रकाश शेटे व नितीन दिनकर यांनी मुलाखती दिल्या. जिल्हा प्रतिनिधी अरुण मुंढे, श्याम पिंपळे, दादासाहेब बोठे, पक्ष निरीक्षक बाळासाहेब पोटघण यांनी निवडीसाठी काम पाहिले. तालुकाध्यक्षपदासाठी अनेकजण इछुक असल्याने त्यांच्यात एकमत होत नव्हते. तसेच तालुक्यातील भाजपमधील अंतर्गत कलहामुळे या निवडीचा चेंडू जिल्ह्याच्या कोर्टात गेला आहे. असे असले, तरी अंकुश काळे व नितीन दिनकर यांच्यापैकी कोणाची या पदावर वर्णी लागते, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
दिनकर यांच्या बाजूने अनेकांचे झुकते माप असल्याने त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात असून, फक्त घोषणा होणे बाकी असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, दिनकर यांच्या नावाला जिल्हा भाजप, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिनकर गर्जेंसह भाजपमधील जुना गट, तर पेचे व काळे यांच्या नावासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे आग्रही असल्याचे समजते. मागील अनेक दिवसांपासून तालुक्यामध्ये भाजपमधील जुना-नवा असा वाद उफाळून आल्याचे दिसून येत होते. भाजपमधील सर्वांचे दिनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याने दिनकर त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी असल्याचे समजते.
काळे यांच्या रूपाने देखील तालुक्याला सामान्य शेतकरी कुटुंबातील, सर्वांना सोबत घेऊन संघटना वाढीसाठी मदत होऊ शकते. तालुक्यातील भाजपमध्ये माजी आ. मुरकुटे समर्थकांचा एक गट, तर भाजपाचे सचिन देसरडा, दिनकर गर्जे व अन्य कार्यकर्ते यांचा एक मोठा गट, तर जुनेच असलेले पण नव्याने भाजपत प्रवेश केलेले विठ्ठलराव लंघे यांचा गट सक्रिय असल्याने या तीनही गटांतील कार्यकर्त्यांना सर्वसमावेशक वाटणाऱ्या, तसेच सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन संघटना वाढीचे काम नवीन अध्यक्षाला करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.