नवा राष्ट्रपती, नवं नाव! अफगाणिस्तानचं नाव बदललं?

काबुल : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. महिलांवरील निर्बंधांसोबतच तालिबान्यांनी आता अफगाणिस्तानचं नवं नाव ठेवल्याची जोरदार चर्चा आहे.
विशेष म्हणजे हेच नाव तालिबानने 1996-2001 मधील आपल्या राजवटीतही दिलं होतं. मात्र, नंतर अमेरिकेसह नाटोच्या सैन्याने तालिबानचा पराभव करत नावात बदल केला. आता पुन्हा अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर तालिबानचा प्रमुख नेता मुल्ला अब्दुल बरादरने अफगाणिस्तानचं नाव अस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असं ठेवलंय.
तालिबानच्या ताब्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी हे आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसह देश सोडून गेले. त्यामुळे आता तालिबनाचा महत्त्वाचा नेता असलेला मुल्ला अब्दुल गनी बरादर हा नवा राष्ट्रपती होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे नवा राष्ट्रपती थेट अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तान’ हे नाव ठेवणार आहे.
अफगाणिस्तानात संघर्ष सुरु असताना तिकडे अमेरिकेत राजकीय वाद सुरु झाला आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सैन्य हटवल्याने हा वाद उफाळल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडन यांना जबाबदार धरत, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
अफगाणिस्तानातून पळाल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. देशातील रक्तपात रोखण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं असं अशरफ गनी म्हणाले. तिकडे अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करजई यांनी व्हिडीओ पोस्ट करुन, आपल्या समर्थकांना काबूलमध्येच राहण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या सैन्य मोहिमेनंतर 2001 मध्ये करजई हे अफगाणिस्तानचे अध्यक्ष बनले होते.
काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सर्व व्यावसायिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. इथून केवळ सैन्याच्या विमानांनाच परवानगी देण्यात आली आहे.
तालिबानने यापूर्वीच दावा केला आहे की काबूलमध्ये राष्ट्रपती भवनचा ताबा आपण घेतला आहे. यानंतर काही तासांनी अल जजीराने एक व्हिडीओ जारी करुन तालिबानी सैन्य राष्ट्रपती भवनात असल्याचं म्हटलं होतं.
अमेरिकेने आपलं अफगाणिस्तानातील दुतावास काबूल विमानतळावर हलवलं आहे. दुतावासावरील झेंडाही उतरुन एअरपोर्टकडे नेण्यात आला.
अफगाणिस्तानचे कार्यवाद गृहमंत्री अब्दुल सत्तार मीरजकवाल यांनी सांगितल्यानुसार, सत्तेचं हस्तांतरण शांततेत होईल. काबूलवर कोणताही हल्ला होणार नाही. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी आणि उपराष्ट्रपती अमीरुल्लाह सालेह देश सोडून निघून गेले.





