Talera Hospital: तालेरा रुग्णालयाचा एसटीपी प्लांट शोभेपुरता, वर्षभरात ड्रेनेज जोडणीच नाही : पाण्याचा अपव्यय
Talera Hospital: रुग्णांच्या स्वच्छतागृहात फ्लॅशला पाणी नसल्याने गैरसोय

पिंपरी – कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या तालेरा रुग्णालयातील एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) प्लांटला वर्षभरानंतरही ड्रेनेज लाइन जोडण्यात आलेली नसल्याने तो वापराविना पडून आहे. त्यामुळे रुग्णालयातील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसून, दुसरीकडे स्वच्छतागृहांमध्ये फ्लॅशसाठी पाणी उपलब्ध नसल्याने रुग्ण आणि नातेवाइकांना पिण्याच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे.
२५० बेडच्या तालेरा रुग्णालयाचे ऑगस्ट २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण झाले. त्यानंतर रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मात्र, लोकार्पणाला वर्ष उलटत आले तरी रुग्णालयातील अनेक कामे अपूर्णच असल्याचे समोर आले आहे.
रुग्णालयातील सर्वच स्वच्छतागृहांमध्ये फ्लशला पाणी नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत माहिती घेतली असता एसटीपी प्लांटला अद्याप ड्रेनेज लाइन जोडलेली नसल्याचे स्पष्ट झाले. परिणामी रुग्णालयातील ड्रेनेजच्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया होत नाही. प्रक्रिया केलेले पाणी फ्लशला जोडण्यात आले आहे. मात्र लाखो-कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला प्लांट मात्र धूळ खात पडला आहे.
एसटीपी प्लांटला ड्रेनेज लाइन जोडण्याची जबाबदारी पर्यावरण विभागाची असल्याचे सांगण्यात येते. मात्र, वर्षभरातही हे काम पूर्ण झालेले नाही. एका विभागाच्या उदासीनतेचा फटका डॉक्टर, परिचारिका, इतर कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना बसत असून, स्वच्छतागृहांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





