Satara: जिल्हा परिषदेत 232 जणांची आरोग्य तपासणी, ‘निरोगी अधिकारी-कर्मचारी, सक्षम जिल्हा परिषद’ उपक्रमाला प्रतिसाद
Satara महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत सातारा जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचार्यांसाठी झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात 232 जणांची तपासणी करण्यात आली.

Satara: महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत सातारा जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचार्यांसाठी झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात 232 जणांची तपासणी करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रिया शिंदे व उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती राजू भोसले यांच्या संकल्पनेतून झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महिला विभागाचे उद्घाटन डॉ. सौ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते, तर पुरुष विभागाचे उद्घाटन राजू भोसले यांच्या हस्ते झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना बेंडाळे उपस्थित होत्या.
मूत्रपिंडाच्या दीर्घकालीन आजारासाठी यूएसीआर टेस्ट, गर्भाशयामुखाचा कर्करोग, उच्च रक्तदाब, हिमोग्लोबिन, ईसीजी, मधुमेह आदी तपासण्या करण्यात आल्या. जिल्हा रुग्णालय आणि कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी 145 पुरुष व 87 महिला, अशा एकूण 232 अधिकारी, कर्मचार्यांच्या तपासण्या केल्या. संबंधितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि उपचारांबाबत सल्ला देण्यात आला.
दैनंदिन कामकाजाच्या व्यापात अधिकारी, कर्मचार्यांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. काही आजारांची लक्षणे सुरुवातीला जाणवत नाहीत. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करुन, आजारांचे वेळेत निदान आणि उपचारांना विशेष महत्व आहे. जिल्हा परिषद कुटुंबातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी निरोगी आणि सक्षम असावा, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे डॉ. सौ. प्रिया शिंदे यांनी सांगितले.
आपल्याला अनेक आजारांची जाणीव नसते. नियमित आरोग्य तपासणीमुळे आजारांचे वेळीच निदान होऊन, गंभीर धोका टाळता येतो. ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ ही संकल्पना राबवताना जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचार्यांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वतःचे आरोग्य जपणारा कर्मचारी अधिक सक्षमपणे समाजाची सेवा करू शकतो, असे मत राजू भोसले यांनी व्यक्त केले.





