Talegaon News: तळेगाव नगरपरिषदेचे ३० कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट
Talegaon News: थकबाकीदारांनी कर भरावा, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांचे आवाहन

तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विकासकामांसाठी आणि नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मालमत्ता कर हा महत्त्वाचा महसुली स्रोत आहे. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारकाने आपला मालमत्ता कर वेळेत भरून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले.
तळेगाव दाभाडे शहरात एकूण ४२ हजार २१३ मालमत्ताधारक आहेत. त्यांच्याकडून सुमारे ३० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट नगरपरिषदेने ठेवले आहे. चालू आर्थिक वर्षातील करासह थकीत मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. मालमत्ता कर वसुलीचे नियोजन करण्यासाठी शहराचे १२ विभाग करण्यात आले आहेत.
वसुली अधिकारी म्हणून आदेश गरुड, प्रफुल्ल गलीयत, संदेश गरुड, मयूर ढिल्लोड, आशिष दर्शले, प्रवीण शिंदे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, सनी ननावरे, विशाल लोणारी आणि अरविंद पुंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेकडून सध्या वसुलीची मोहीम सुरू असून, आतापर्यंत सुमारे पाच कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे, अशी माहिती कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी दिली.
वेळेत कर भरल्यास एक टक्का सूट
मालमत्ता कराचे बिल मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत कर भरल्यास एक टक्का सूट दिली जाते. मात्र, बिल मिळाल्यानंतर ९० दिवसांनंतर कर भरल्यास दोन टक्के अतिरिक्त व्याज आकारले जाते. त्यामुळे नागरिकांनी मुदतीत कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी केले.
नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर आणि उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुलीचे नियोजन करण्यात आले आहे.





