Talegaon Dhamdhere : तळेगाव ढमढेरे येथे भैरवनाथ यात्रेचा उत्साह; यंदाच्या ७४ व्या वर्षात रंगणार बैलगाडा शर्यतींची धूम
Talegaon Dhamdhere : यात्रेचे यंदाचे ७४ वे वर्ष असून यात्रा शुक्रवार दि. १० व शनिवार दि. ११ रोजी पार पडणार

पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व.समाजभूषण किसनभाऊ भुजबळ यांनी सुरू केलेल्या यात्रेचे यंदाचे ७४ वे वर्ष असून यात्रा शुक्रवार दि. १० व शनिवार दि. ११ रोजी पार पडणार आहे. शुक्रवार दि. १० रोजी सकाळी श्री भैरवनाथ देवाचा अभिषेक संपन्न होणार असून सकाळी ८ वाजता मंदिरापासून पांढरी वस्ती ते बाजारपेठ मार्गे छबिना काढण्यात येणार आहे.
यानंतर सकाळी १० वाजता यात्रा कमिटीच्या वतीने बैलगाड्यांच्या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीत प्रथम क्रमांकासाठी ७१,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५१,००० रुपये तर तृतीय क्रमांकासाठी २५,००० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
फायनलसाठी १२ बक्षिसांचा समावेश
फायनलसाठी एकूण १२ बक्षिसांचा समावेश असून त्यामध्ये ३ टू-व्हीलर गाड्या, ३ कुट्टी मशीन, ३ फ्रिज व ३ एलईडी टीव्ही देण्यात येणार आहेत. शर्यतीसाठी टोकन सोडत गुरुवार दि. ०९ रोजी यात्रा कमिटीच्या कार्यालयात पार पडणार आहे.
शर्यतीनंतर रात्री ९ वाजता पद्मश्री पुरस्कार विजेते रघुवीर खेडकर व कांताबाई सातारकर यांच्या लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. ११ रोजी सकाळी ९ वाजता रघुवीर खेडकर व कांताबाई सातारकर यांचा हजेरीचा कार्यक्रम होणार असून दुपारी ४ वाजता आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री ९ वाजता राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे व नितीन कुमार करवडीकर यांच्या लोकनाट्य कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे. या दोन दिवसांच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा:
Crime News : शिरूर येथे एटीएसची मोठी कारवाई; मॅफेड्रॉन ड्रग्ज विक्री करणारे दोघे ताब्यात




