Talegaon Dabhade : अवकाळी पावसाचा कापणीस आलेल्या भातपिकाला फटका
Talegaon Dabhade : उभ्या पिकांसह कापून ठेवलेला भातही भिजला; पशुपालकांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न

तळेगाव दाभाडे – कापणीस तयार झालेल्या खरीप भातपिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मावळ तालुक्याच्या विविध भागांत पाऊस सुरू असल्याने भात उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
मावळ तालुका खरीप भातपिकाचे आगार म्हणून ओळखला जातो. यंदा तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भातलागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला पावसाने ताण दिल्याने भातलागवडीला सुमारे एक महिना उशीर झाला होता.
मात्र जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत मान्सूनने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पावसाची तूट भरून निघाली आणि भातपीक जोमात आले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
मात्र भाताच्या दाणे भरण्याच्या अंतिम टप्प्यात पुन्हा पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. सध्या भातपीक कापणीसाठी तयार झाले असून, काही शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवातही केली आहे.
अशातच अवकाळी पावसाने जोर धरल्याने उभे भातपीक तसेच कापणी करून शेतात ठेवलेले पीक भिजले आहे. त्यामुळे डोळ्यादेखत पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
काही भागांत पावसाचा जोर अधिक असल्याने उभ्या पिकांसह कापलेल्या भाताचेही नुकसान झाले आहे. शेतातील खाचरांमध्ये पाणी साचल्याने भाताचा पेंढा आणि जनावरांचा चारा भिजत आहे. त्यामुळे आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत.
अवकाळी पावसामुळे काही भागांतील भातपिकाचे नुकसान होत असल्याची माहिती सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी दिली.
PMRDA : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मेट्रो प्रवास





