प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी गर्दी उसळली होती. नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज तर नगरसेवक पदासाठी तब्बल ९७ अर्ज सोमवारी (दि. १७) दाखल झाले. आतापर्यंत प्राप्त अर्जांची संख्या पाहता नगरसेवक पदासाठी एकूण १३३ अर्ज दाखल झाले आहेत. अंतिम दिवशी पाच उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले असून त्यात भाजपचे माजी शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, माजी नगराध्यक्षा रंजना भोसले, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विशाल सतीश वाळुंज आणि सौरभ दाभाडे या पाच नावांचा समावेश आहे. नगरसेवक पदाच्या २८ जागांसाठी तब्बल १३३ उमेदवारी अर्जांची नोंद झाली आहे. अखेरच्या दिवशीच ९७ अर्ज दाखल झाल्याने सर्वच प्रभागात स्पर्धा तीव्र होणार असल्याचे दिसत आहे.अनेक उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ढोल-ताशांच्या गजरात शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरपरिषद कार्यालयासमोर मोठी गर्दी झाल्याने आसपासच्या प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.