Talegaon Dabhade: निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज – हेमंत हरहरे
Talegaon Dabhade: तळेगाव नगरपरिषदेतील सभागृहाचे नथुभाऊ भेगडे पाटील सभागृह असे नामकरण

तळेगाव दाभाडे – समाजासाठी निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारी सदस्य हेमंत हरहरे यांनी केले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील सभागृहाला थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील यांचे नाव देण्यात आले. या सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, प्रदेश किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष गणेश भेगडे, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे,
नथुभाऊ भेगडे पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य, माजी नगरसेविका वैशाली भेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथराव टिळे, भाजपचे शहराध्यक्ष विनायक भेगडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, संतोष वसंतराव भेगडे पाटील, भास्कर भेगडे आदींसह नागरिक उपस्थित होते.
शहराचा इतिहास आणि सुसंस्कृतपणा जपत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासकामांसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. नथुभाऊंनी दिलेला वसा आणि वारसा लोकप्रतिनिधींनी पुढे चालवावा, असे आमदार सुनील शेळके म्हणाले.
माजी मंत्री बाळा भेगडे यांनी, समाजाच्या विकासाची गरज ओळखून नथुभाऊंनी लोकप्रतिनिधींसमोर सेवेचा आदर्श ठेवला असल्याचे सांगितले. गणेश खांडगे यांनी नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीचे उद्घाटन आणि नव्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहाला नथुभाऊंचे नाव देण्याचा योगायोग अधोरेखित केला.
सुमारे ५० वर्षांनंतर हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या समाजसेवेची जाणीव ठेवून काम करावे, असेही ते म्हणाले.
नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील म्हणाले, कै. नथुभाऊ भेगडे पाटील यांनी शहराच्या विकासासाठी जनसेवेची परंपरा निर्माण केली. या परंपरेचा आदर राखत भविष्यातही समाजहिताची कामे सुरू ठेवली जातील. तर उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी नगरपरिषदेच्या इतिहासाला उजाळा दिला. या सभागृहाच्या माध्यमातून तळेगावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला, याचे मूर्तिमंत उदाहरण नथुभाऊंच्या जीवनातून दिसते. त्यांचा समाजसेवेचा वसा आणि वारसा पुढे नेणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे रवींद्र भेगडे यांनी सांगितले. पक्षप्रतोद सत्यम खांडगे यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी प्रास्ताविक केले.
ॲड. विनय दाभाडे आणि श्रीकांत मेढी यांनी सूत्रसंचालन केले. तर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, आरोग्य विभागाचे अधिकारी रोहित भोसले, प्रदीप टेकवडे आदींनी प्रयत्न केले. नगरसेवक शिवाजीराव आगळे यांनी आभार मानले.
Student organizations: आंदोलन स्वातंत्र्यावरील बंधने तातडीने उठवा!





