Talegaon Dabhade – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक दीर्घ चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. मात्र, या अंदाजपत्रकात पाणीपट्टीत वाढ करण्यात आल्याने नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, पक्षप्रतोद सत्यम खांडगे, गटनेते इंद्रकुमार ओसवाल, गटनेत्या हेमलता खळदे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपमुख्य अधिकारी ममता राठोड, सर्व विभागाचे प्रमुख आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी अंदाजपत्रकातील तरतुदीचे वाचन लेखापाल श्रुती सोमवंशी यांनी केले. सदर अंदाजपत्रक सुमारे ४५० कोटी रुपये जमेचे असून ४४९ कोटी ९१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अंदाजे ९ लाख रुपयांची शिल्लक दाखविण्यात आली आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, उद्याने व बागा, समाजमंदिरे, स्मशानभूमी व दफनभूमी, शिक्षण विभाग, क्रीडा संकुल, चौकांचे सुशोभीकरण, आदर्श रस्ते आदी विकासकामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, पाणीपट्टी वाढीच्या निर्णयामुळे काही नगरसेवकांनी व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून आगामी काळात यावर अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे. अंदाजपत्रकातील ठळक वैशिष्ट्ये अकार फाउंड्री येथे शाळा उभारणी, सरसेनापती उमाबाई दाभाडे शाळेचे काम, डिजिटल लायब्ररी सुरू करणे, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उन्नती योजना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तरतूद, मामासाहेब खांडगे क्रीडा संकुल विकसित करणे, बनेश्वर स्मशानभूमी विकास, श्री डोळसनाथ महाराज मंदिराचे काम पूर्ण करणे, शहरातील मुख्य चौकांचे सुशोभीकरण, प्रत्येक प्रभागात चांगल्या दर्जाचा रस्ता उभारणे, नगरपरिषदेचे शासकीय रुग्णालय बांधकाम, भुयारी गटार योजनेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव, आंद्रा धरणातून पाणीपुरवठा नियोजन, अमृत-२ योजनेसाठी तरतूद, ई-ऑफिस प्रणाली सुरू करणे आणि सौर ऊर्जा, एसटीपी, रेन वॉटर हार्वेस्टिंग व घनकचरा व्यवस्थापन राबवणाऱ्या मालमत्ता धारकांना कर सवलतीची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. “सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. सोबतच शहर विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.” – संतोष दाभाडे, नगराध्यक्ष “शहराच्या दृष्टीने आरोग्य, शिक्षण आणि विकासकामांच्या अनुषंगाने हे अंदाजपत्रक असून भविष्यकाळात याचा फायदा नागरिकांना होणार आहे.” – गिरीश दापकेकर ,मुख्याधिकारी