Talegaon Dabhade : विकासाची नवी पायाभरणी! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते नगरपरिषदेच्या नव्या वास्तूचे सोमवारी लोकार्पण

प्रभात वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे – नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोहळा सोमवारी संपन्न होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इमारतीचे लोकार्पण होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.या लोकार्पण सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे,
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधूरी मिसाळ, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, संजय भेगडे, माजी आमदार रुपलेखा ढोरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, पुणे पीपल्स बँकेचे संचालक बबनराव भेगडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे, सुरेश चौधरी, माजी उपनगध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, यादवेंद्र खळदे, श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
नगरपरिषदेची जुनी इमारत सुमारे ५० वर्षांपूर्वीची असल्याने वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रशासकीय इमारतीची गरज होती. सन २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून या वास्तूचे काम सुरू करण्यात आले होते. या बांधकामासाठी एकूण ४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यापैकी सिव्हील वर्कसाठी २७ कोटी, फर्निचरसाठी ८ कोटी, तर इलेक्ट्रिकल कामांसाठी ५ कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे राम सरगर यांनी दिली. या नव्या इमारतीमुळे नगरपरिषदेचे प्रशासकीय कामकाज अधिक सुगम, सुसंगत आणि नागरिकाभिमुख होणार असल्याचा विश्वास मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी व्यक्त केला.
इमारतीची रचना..
ही वास्तू तळमजल्यासहित चार मजली असून प्रत्येक मजल्यावर प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक विभागांचे नियोजन करण्यात आले आहे.
१.पहिला मजला – कर व प्रशासकीय अधिकारी कक्ष, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य, विद्युत, आवक-जावक आणि अग्निशमन विभाग
२.दुसरा मजला – नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष कक्ष, लोकप्रतिनिधी कक्ष आणि कॉन्फरन्स हॉल
३.तिसरा मजला – बांधकाम, नगररचना, लेखा विभाग आणि मुख्याधिकारी कक्ष
४.चौथा मजला – संगणक व शिक्षण विभाग, पंचकोनी डुप्लेक्स सभागृह आणि पत्रकार बाल्कनी




