तळेगाव दाभाडे – तालुक्यात खरीप भात पिकाची कापणी अंतिम टप्प्यात पोहोचताच तालुक्यातील शेतकरी आता रब्बी पिकांच्या पेरणीस जोरात लागले आहेत. भात काढणी संपत आली असून संपूर्ण तालुक्याचे ग्रामीण वातावरण पुन्हा एकदा शेतीकामांनी गजबजले आहे. मावळ तालुका हा खरीप भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असून तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जाते. साधारणपणे भात पिकाला १२० ते १२५ दिवसांचा कालावधी लागतो. भात लागवडीनंतर सुमारे चार महिन्यांत पीक कापणीस तयार होते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यापासून तालुक्यात खरीप काढणीचा हंगाम सुरू झाला होता. मावळ तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ९८ टक्के भात काढणी पूर्ण झाली असून उर्वरित काही भागातील काढणी या आठवड्याअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील खरीप हंगाम जवळपास संपला असल्याचे चित्र आहे. भात काढणीनंतर शेतकरी पारंपरिक पद्धतीने भाताच्या शेतातील खाचरात गहू, हरभरा, मसूर, वाटाणा या रब्बी पिकांची लागवड करतात. यंदाही याच पद्धतीने शेतकरी रब्बीच्या कामाकडे वळले असून तालुक्याच्या बहुतांश भागांत रब्बी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. ज्या शेतांमध्ये भात काढणी पूर्ण झाली आहे आणि जमिनीत पुरेसा पाण्याचा वापसा झालेला आहे, त्या ठिकाणी पेरण्या वेगात सुरू आहेत. काही ठिकाणी मात्र अद्याप वापसा न झाल्यामुळे पेरणी थोडी रखडलेली असून, जमीन आटताच या भागांतही पेरण्या सुरू होतील, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. मुसळधार पावसामुळे भात उत्पादन समाधानकारक यंदाच्या खरीप हंगामात मावळ तालुक्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली होती. मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत वेळोवेळी मुसळधार पाऊस पडत राहिला. या सातत्यपूर्ण पावसामुळे तालुक्यातील भात पीक जोमदार, भरघोस आणि चांगल्या प्रतीचे आले. विशेषतः तालुक्यात प्रामुख्याने लागवड होणाऱ्या इंद्रायणी जातीच्या भाताला हवामानाची मोठी साथ लाभली. परिणामी बहुतांश भागांत शेतकऱ्यांचे उत्पादन समाधानकारक झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. शेवटच्या टप्प्यात पावसाचा फटका मात्र भात काढणीच्या अखेरच्या टप्प्यात पुन्हा मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने काही भागांत शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. विशेषतः ज्या शेतांमध्ये भात कापून शेतात किंवा बांधावर ठेवण्यात आला होता, त्या ठिकाणी पावसामुळे भात भिजून दाण्याच्या प्रतीवर परिणाम झाल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तरीदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नसून बहुतांश शेतकऱ्यांचे पीक सुरक्षित राहिल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. भात झोडणी जवळपास पूर्ण भात काढणीनंतर बहुतांश शेतकऱ्यांनी काढलेला भात झोडणी करून तयार केला आहे. काही शेतकरी मात्र अजूनही भाताची पेंढी शेतात किंवा बांधावर रचून ठेवत असून, येत्या काही दिवसांत त्याची झोडणी केली जाणार आहे. सध्या तालुक्यातील शेतकरी रब्बी पिकांच्या पूर्वमशागती, खत व्यवस्थापन आणि पेरणी या कामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे. शेती अवजारांचा आवाज, बी-बियाण्यांची खरेदी-विक्री आणि शेतात सुरू असलेली मशागत यामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा कृषी हालचालींना वेग आला आहे. रब्बी हंगामाबाबत आशावाद भात उत्पादन समाधानकारक झाल्याने शेतकरी वर्गात रब्बी हंगामाबाबत आशावादी वातावरण आहे. पाणीसाठा चांगला असल्यास यंदा रब्बी पिकांचे उत्पादनही चांगले होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. एकूणच, मावळ तालुक्यात खरीप हंगामाचा यशस्वी शेवट होत असून रब्बी हंगामाची आशादायी सुरुवात होत असल्याचे सकारात्मक चित्र सध्या दिसून येत आहे.