Talegaon Dabhade – मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी शासनाची अभय योजना चालू आर्थिक वर्षात तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील मालमत्ताधारकांसाठी राबविण्यात येणार आहे. १९ मे २०२५ अखेर थकबाकी असलेल्या मिळकतधारकांच्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या २ टक्के दंडात्मक व्याजावर १०० टक्के सूट देण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीच्या अधीन राहून, सन २०२५-२६ अखेरपर्यंतच्या मालमत्ता कराच्या मागील थकबाकीवर लागलेले २ टक्के दंडात्मक व्याज वगळून कर संकलन विभागात भरणा करणाऱ्या मिळकतधारकांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेऊन कराचा भरणा करावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. तळेगाव दाभाडे हद्दीतील मालमत्ताधारकांकडून कर वसुलीची मोहीम मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड व कर अधिकारी कल्याणी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चालू वर्षात एकूण ३८ कोटी रुपयांची कर वसुलीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत १२ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. १९ मे २०२५ अखेर थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत कराचा भरणा केल्यास २ टक्के दंडात्मक व्याजाची संपूर्ण माफी मिळणार असल्याची माहिती कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी दिली. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांनी त्वरित पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.