प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – ऐतिहासिक वसा व वारसा लाभलेलं तळेगाव दाभाडे शहर, स्वराज्यातील पहिल्या महिला सरसेनापती म्हणून आपल्या शौर्याने गाजवलेल्या सरसेनापती उमाबाई दाभाडे त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल हे गाव, मावळ तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून नावाजलेलं हे शहर, शहराच्या बाजूला असलेली औद्योगिक वसाहत, शहरांमध्ये असलेलं शैक्षणिक हब, स्वच्छ हवा, मुबलक पाणी असल्याने सेकंड होमसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव, या सर्वांग सुंदर अशा शहरांमध्ये भव्य अशी पाच मजली नगरपरिषदेची नूतन इमारत व त्याचे समोरच छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्यव रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिवशंभू स्मारक यामुळे ऐतिहासिक गावाच्या वैभवामध्ये मोठी भर पडली आहे. या नूतन इमारतीच्या जागेवर ५० वर्षांपूर्वी थोर समाजसेवक स्वर्गीय नथुभाऊ भेगडे पाटील हे नगराध्यक्ष असताना बांधलेली नगर परिषदेची इमारत ही वाढते लोकसंख्या आणि शहराची झालेली झपाट्याने वाढ यामुळे प्रशासकीय कामकाजाला लहान पडत होती. हा विचार करून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मागणीनुसार आणि पाठपुराव्याने सन २०२२मध्ये जुनी इमारत पाडण्यात आली आणि नूतन इमारतीचे भूमीपुजन राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या नूतन इमारतीचे काम पूर्ण होताना त्याचे उद्घाटन देखील राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच हस्ते होत आहे. हा निश्चितच तळेगावकरांसाठी दुग्धशर्करा योग म्हणाले तर वावगे ठरणार नाही.जुन्या इमारतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर केशवराव ब. हेडगेवार भवन असे नाव होते. तेच नाव सर्वानुमते पुन्हा कायम करण्यात आले आहे. तसेच सभागृहास थोर समाजसेवक, माजी नगराध्यक्ष नथूभाऊ भेगडे पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या इमारतीच्या प्रवेशद्वारावर सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या प्रतिमा स्वरूप पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.या इमारतीच्या पाच मजल्यामध्ये मुख्याधिकारी, उपमुख्यअधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, समितींचे सभापती, नगरसेवक, पत्रकार आदी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या पाचही मजल्यावर अत्याधुनिक संगणीकृत कामकाजासोबतच उत्कृष्ट बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. इमाऱतीच्या उदघाटनाची जय्यत तयारी आज राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते उद्घाटन होत आहे. मावळचे आमदार सुनील शेळके व सहकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून ठिकठिकाणी मान्यवरांच्या स्वागतासाठी कमानी व त्यावर थ्रीडीच्या कलेने रेखाटलेले ऐतिहासिक प्रसंग उभारले आहेत. मावळ तालुक्यामध्ये आज पर्यंत झालेल्या आमदारांपैकी स्वर्गीय आमदारांच्या नावाने उभारण्यात आलेले प्रवेशद्वार निश्चितच लक्ष वेधून घेत आहेत. शिवशंभू स्मारक ठरणार आकर्षण तळेगाव नगरपरिषदेच्या इमारतीसमोरच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांचे संयुक्त शिवशंभू स्मारक उभारण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा देखील आजच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.