शिरूर: टाकळी हाजी स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या प्रतीक्षेत; गुन्हे वाढले, शासनाकडून दिरंगाई

शिरूर – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे स्वतंत्र पोलिस ठाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. २०२२ मध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांनी शासनाकडे सुधारित प्रस्ताव पाठवला, पण तीन वर्षांनंतरही निर्णय झालेला नाही. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, शिरूर पोलिस ठाण्याची विस्तृत हद्द आणि कर्मचारी टंचाईमुळे गुन्ह्यांचा तपास रखडतोय.
टाकळी हाजी आणि परिसरातील २५ गावांमध्ये भुरट्या चोऱ्या, सोनसाखळी चोरी, विद्युत मोटार चोरी, लूट, दरोडे, आर्थिक गुन्हे आणि महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. २०१९ ते २०२४ या सहा वर्षांत गुन्ह्यांची संख्या अनुक्रमे ३१३, ३४८, ३९१, १७९, २२२ आणि २३१ अशी नोंदली गेली. सध्या नागरिकांना शिरूर, शिक्रापूर किंवा रांजणगाव पोलिस ठाण्यांवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे वेळ आणि पैसा वाया जातो.
नवरात्र, दसरा आणि यात्रेदरम्यान मळगंगा माता मंदिर (टाकळी हाजी) आणि येमाई माता मंदिर (कवठे येमाई) येथे लाखो भाविक येतात. याशिवाय, बेल्हा-जेजुरी, अष्टविनायक महामार्ग आणि मलठण-कवठे येमाई-मंचर-भीमाशंकर मार्गावर अपघात आणि वाहतूक कोंडी वाढली आहे. अहिल्यानगर-पुणे सीमावर्ती भागात गुन्हेगारांचा वावर असल्याने नाकाबंदीचा ताण पोलिसांवर पडतो. प्रस्ताव मंजूर असूनही शासनाकडून कार्यवाही होत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. लोकप्रतिनिधींकडूनही दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. नागरिकांनी लवकरात लवकर पोलिस ठाणे सुरू करण्याची मागणी केली आहे.





