महाराष्ट्रातील झिका विषाणू प्रकरणाची दखल; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक नियमावली जारी

पुणे – महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्ग झालेले काही रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी देशातील झिका विषाणूच्या स्थितीवर दक्षता बाळगण्यासाठी मार्गदर्शक नियमावली राज्यांना जारी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
झिका चाचणी करण्याची सुविधा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), पुणे, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी), दिल्ली आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या काही निवडक विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध आहे. त्यांचा उच्च स्तरावर आढावा घेतला जात आहे.
आरोग्य सेवा महासंचालनालयाने या वर्षाच्या सुरुवातीला २६ एप्रिल रोजी एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती आणि संचालक, राष्ट्रीय व्हेक्टर प्रणित रोग नियंत्रण कार्यक्रम यांनी फेब्रुवारी आणि एप्रिल २०२४ मध्ये राज्यांना एकाच वेक्टर डासाद्वारे पसरणाऱ्या झिका, डेंग्यू आणि चिकुनगुनियाबद्दल पूर्वसूचना देण्यासाठी दोन मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
या आहेत सूचना
– झिकाची लागण झालेल्या गरोदर स्त्रीच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवावे, केंद्रसरकारच्या मार्गदर्शक सूचनांवर काम करावे.
– आरोग्य सुविधा/ रुग्णालये यांनी देखरेख करण्यासाठी आणि आपले संकुल एडीस डासापासून मुक्त ठेवण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याला तैनात करावे.
– राज्यांनी निवासी भाग, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकाम सुरू असलेल्या जागा, संस्था आणि आरोग्य सुविधा यामध्ये कीटकप्रतिबंधक उपाययोजना करावी.
– प्रसिद्धी माध्यमांमधून जनजागृती करावी.
– २०१६ पासून देशात झिका विषाणू संबंधित मेंदूवाढदोषाची प्रकरणे आढळलेली नाहीत. परंतु असे प्रकरण आढळल्यास तातडीने त्याची माहिती एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम(आयडीएसपी) आणि नॅशनल सेंटर फॉर व्हेक्टर बोर्न डिसिजेस कंट्रोल यांना कळवावी.
या वर्षात दोन जुलै २०२४ पर्यंत आढळलेले रुग्ण
पुणे – ०६
कोल्हापूर – ०१
संगमनेर – ०१





