Amol Mitkari : “राजकारणात भूमिका घेताना अनेकदा वादळं आली, पण…”; आमदारकीच्या शेवटच्या दिवशी अमोल मिटकरींची भावूक पोस्ट
Amol Mitkari : अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या राजकीय प्रवासाचा आढावा मांडला आहे.

Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांचा विधान परिषद सदस्याचा आज १३ मे रोजी कार्यकाळ संपत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आमदरकीच्या शेवटच्या दिवशी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
अमोल मिटकरी उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी ‘देवगिरी’ बंगल्यावर हजेरी लावली. त्यांच्या या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आमदारकीच्या शेवटच्या दिवशी अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या राजकीय प्रवासाचा आढावा मांडला आहे. तसेच त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.
पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, “आज १३ मे २०२६ रोजी माझा विधान परिषद सदस्य म्हणून कार्यकाळ संपत आहे. हा केवळ एका पदाचा शेवट नसून संघर्षमय आणि शिकवण देणाऱ्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. मागील सहा वर्षांत संघर्ष, टीका आणि एकटेपण अनुभवले, मात्र जनतेचं प्रेम आणि विश्वास हेच माझं बळ राहिलं.”
सर्वांना सस्नेह जय शिवराय 🙏
आज दिनांक १३ मे २०२६ रोजी माझा विधान परिषद सदस्य म्हणून कार्यकाळ संपत आहे. आयुष्यातील हा केवळ एका पदाचा शेवट नाही, तर एका वादळी, संघर्षमय आणि शिकवण देणाऱ्या राजकीय प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा आहे.मागील सहा वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले. संघर्ष पाहिला,… pic.twitter.com/aToQdenopU
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 13, 2026
तसेच, विधान परिषदेत सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी नमूद केलं. “वादळं आली, पण प्रत्येक वादळाने मला अधिक मजबूत केलं,” असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अजित पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मिटकरी म्हणाले, “दादांचं मार्गदर्शन आणि विश्वास मला कायम मिळाला. त्यांनी दिलेल्या संधीमुळे महाराष्ट्राच्या प्रश्नांवर काम करण्याची ताकद मिळाली. त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही.”
पुढील राजकीय वाटचालीचे संकेत देताना त्यांनी १४ मेपासून नव्या प्रवासाला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं. “हा प्रवास अधिक संयमी, अधिक प्रगल्भ आणि महाराष्ट्राच्या मातीशी आणखी घट्ट नातं जोडणारा असेल,” असं त्यांनी नमूद केलं आहे.
झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत असून, त्यातील एक जागा अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहे. त्या जागेवर अमोल मिटकरी यांना पुन्हा संधी न देता झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा : Alia Bhatt : ‘कान्स’मधील आलिया भट्टचा लक्षवेधक लूक! रेड कार्पेटवर दिसला ग्लॅमरस अंदाज





