Pune : खबरदारी घेऊ; अपघातमुक्त होऊ !

पुणे, दि. 16 -शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या आधीही अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे अपघाती निधन झाले आहे. या महत्त्वाच्या व्यक्ती असल्या तरी एकूणच जगभरात सुमारे पाच दशलक्ष लोक अपघातात दरवर्षी मरतात. एकट्या भारतात दरवर्षी अपघातामुळे सुमारे 10 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर 20 लाखांपेक्षा जास्त गंभीर जखमी होतात. दर पाच मिनिटांना एकाचा अपघाती मृत्यू होतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
दरवर्षी 17 ऑक्टोबर हा दिवस “जागतिक आघात दिन’ म्हणून पाळला जातो. आघात म्हणजे शरीराला झालेली कोणतीही इजा. अनेकदा रस्ते अपघात, भाजणे, पडणे, हिंसाचार आणि महिला, मुले आणि वृद्धांसह असुरक्षित लोकांवर गुन्ह्यांतून केली जाणारी दुखापत होऊ शकते. मात्र यामध्ये सर्वाधिक आघातांची नोंद ही रस्ते अपघातांची होती. ती नोंद काही लाखांची असते. यामध्ये थेट जीव जाण्यापर्यंतच वेळ येते. याशिवाय गंभीर इजा आणि कायमचे अपंगत्त्व येते. हे होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना ते त्याचे राष्ट्रीय कर्तव्य आहे असेच आता म्हणावे लागेल.
अपघातांची कारणे
बेजबाबदारपणे आणि वेगाची मर्यादा न पाळता वाहन चालविणे
मद्यपान करून वाहन चालविणे
रस्त्यांची दूरवस्था
लेन कटींग
हायवे आणि अन्य मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांवरून वाहन थेट मोठ्या रस्त्यांवर येणे
ब्रेक फेल
वाहतुकीचे नियम माहीत नसणे
सुरक्षेच्या साधनांचा वापर न करणे
काय केले पाहिजे?
वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळावेत
हेल्मेटसह अन्य सुरक्षेच्या साधनांचा वापर करावा
वाहन चालविताना मोठ्याने गाणी ऐकणे, मोबाइलवर बोलणे टाळावे
चारचाकी वाहनात बसताना सीट बेल्टचा वापर करावा
हायवेवर वेगमर्यादा पाळणे
प्रवासाला जाताना नेहमी आपत्कालीन नंबर जवळ बाळगावेत.
अपघातानंतर काय करावे?
अपघाती व्यक्ती बेशुद्ध असेल तर त्याला तोंडाने काहीही देऊ नये
फ्रॅक्चर किंवा सूज असल्यास अवयव आधाराशिवाय हलवू नये
डोके किंवा पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यास आधाराशिवाय, मदतीशिवाय व्यक्तीला अपघाताच्या ठिकाणाहून हलवू नये
बेशुद्ध किंवा अर्धचेतन व्यक्तीला द्रवपदार्थ (पाणी, शीतपेये) देऊ नये
आपत्कालीन नंबरवर कॉल करावा.




