महाराजस्व अभियानाचा लाभ घ्या: तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांचे आवाहन

वारुळवाडी: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने १ ते ७ ऑगस्ट कालावधीत राबवण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहांतर्गत जुन्नर तहसील कार्यालयाच्या नारायणगाव मंडल क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे उद्घाटन तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांच्या हस्ते झाले. यावेळी नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. शेळके यांनी केले.
तहसीलदार डॉ. शेळके यांनी उपस्थितांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. मंडल अधिकारी शितल गर्जे यांनी संजय गांधी डीबीटी लाभार्थ्यांना ग्राम महसूल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करत अभियानात वाटप केलेल्या दाखल्यांची आकडेवारी सादर केली. यामध्ये उत्पन्न दाखले ५२, नॉन क्रिमीलेयर १३, जातीचे दाखले ३५, डोमेसाईल ३१ आणि ईडब्ल्यूएस ९ दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच रेशनिंग कार्डमधील नाव कमी करण्याची २५ आणि ऑनलाइन नोंदणीची ३० प्रकरणे पूर्ण करण्यात आली.
कार्यक्रमाला वारुळवाडीचे सरपंच विनायक भुजबळ, नारायणगावच्या सरपंच शुभदा वाव्हळ, उपसरपंच बाबू पाटे, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, मंडल अधिकारी शितल गर्जे, ग्राम महसूल अधिकारी रुपेश इलग, वर्षा लांडे, पल्लवी पंचवटे, एन.जे. खान, हरिष सातपुते, धनंजय गायकवाड, ई-सेवा केंद्र चालक राजेश बाप्ते, अमित रेपाळे, रेशनिंग दुकानदार इम्रान आत्तार, बबन पानसरे, जयंतीलाल सुराणा, यल्लू लोखंडे, सुजाता डोंगरे, सचिन दहितुले, ओंकार नेहरकर, युवा शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष अशफाक पटेल, महसूल सहाय्यक सागर डोके, रवींद्र खेबडे, संजय गाडेकर, अब्बास तांबोळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांना आदर्श तहसीलदार पुरस्कार मिळाल्याबद्दल मंडल अधिकारी शितल गर्जे, ग्राम महसूल अधिकारी, सरपंच विनायक भुजबळ, अशफाक पटेल, रेशनिंग दुकानदार आणि ई-सेवा केंद्र चालक यांच्याकडून सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल गर्जे यांनी केले, तर आभार रुपेश इलग यांनी मानले.



