Pimpri : प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा

पिंपरी : राज्यातील मराठा व बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातआंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी युवक, मराठा सेवा संघ, छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या भ्याड हल्ल्याचा निषेध करून सरकारने हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावे व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इमरान शेख म्हणाले ‘‘प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हा भ्याड हल्ला संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवर तसेच मराठा समाजावर झालेला असून असले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. या हल्ल्यास सरकार जबाबदार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख संघटनेच्या नावात आहे, हे कारण पुढे करत हल्ला करणारा भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी दीपक काटे हा सराईत गुन्हेगार असून खून, खंडणी यासारखे गुन्हे त्याच्या नावावर आहेत.’’
तसेच बंच ऑफ थॉट्स या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केली गेली आहे, त्यावर भाजपचे गुंड मूग गिळून गप्प का बसले आहेत? पुरोगामी चळवळीच्या नेत्यांना वेगळा न्याय आणि भाजपच्या नेत्यांना वेगळा न्याय हे धोरण भाजप सरकार राबवत आहे का? भाजप युवा मोर्चाच्या या दीपक काटेवर भाजप काही कारवाई करणार आहे का? असे संतप्त सवाल युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी उपस्थित केले आहेत.





