खासदार संजय काकडे यांच्यावर कारवाई करा

न्यू कोपरे गावातील सदनिका प्रकरणी “युक्रांद’ची मागणी
पुणे – बांधकाम व्यावसायिक आणि खासदार असलेल्या संजय काकडे यांनी न्युकोपरे गावाच्या पुनर्वसन प्रकल्पात करारानुसार वंचितांना सदनिका, जागा मुदत उलटूनही दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी “युवक क्रांती दला’ (“युक्रांद’) तर्फे करण्यात आली असून, तसे निवेदनही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले आहे.
यासंदर्भात “युक्रांद’चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी थोरात यांच्याशी 17 फेब्रुवारी रोजी फोनवर संपर्क साधून चर्चा केली होती. निवेदन देताना डॉ. सप्तर्षी यांच्या समवेत संदीप बर्वे, अप्पा अनारसे, सचिन पांडूळे, कमलाकर शेटे, आदित्य आरेकर हे युक्रांदचे पदाधिकारी आणि यलाप्पा धोत्रे, नंदू शेळके, ललित मुथा, अनिल कौल हे वंचित प्रकल्पग्रस्त न्युकोपरे ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी राखीव असलेल्या जुने हिंगणे गायरानाची जागा विकसनासाठी देऊन शासनाने संजय काकडे यांच्याशी करार केला होता. त्यानुसार सदनिका किंवा मोकळा भूखंड प्रकल्पग्रस्तांसाठी देय असताना अनेकांकडून हक्कसोडपत्र घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा “युक्रांद’चा आरोप आहे. या सर्व प्रकरणात 2001 साली महाराष्ट्र सरकार, (वतीने जिल्हाधिकारी पुणे) विकसक काकडे आणि पुनर्वसित होणारी कुटुंबे यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला, मात्र मूळ यादीमधून अनेक कुटुंबांना वगळण्यात आले.
काही आर्थिक दुर्बल कुटुंबांना थोडीशी रक्कम देऊन त्यांच्याकडून हक्कसोड पत्रे घेण्यात आली. त्यांच्याकडून सदनिका खरेदी केल्याचा दावा विकसक करीत आहे. हा बेकायदेशीर आणि गैरप्रकार आहे, असे डॉ. सप्तर्षी यांचे म्हणणे आहे. या विषयात विकसक काकडे यांच्याकडे करारापेक्षा जास्त जागा असल्यास ती काढून घेण्यात यावी. याशिवाय या प्रकरणात काकडे यांची कसून चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात दोषी आढळल्यास ते हयात असेपर्यंत त्यांना सरकारचे कोणतेही कंत्राट देऊ नये, अशीही मागणी डॉ. सप्तर्षी यांनी केली आहे.





