वाघोली – पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत वाघोलीमध्ये यापूर्वी गोडाऊन किंवा कंपन्या जळालेल्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिस्का कंपनीची चौकशी होऊन कामगारांच्या जीवितला धोका निर्माण करणाऱ्या कंपनीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी अपर आयुक्त कामगार तसेच सहायक आयुक्त वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संदीप सातव यांनी सांगितले की, कंपनीत काम करताना कामगारांना कोणतेही हेल्मेट, हॅन्ड ग्लोज, सेफ्टी बेल्ट अथवा विजेचा धोका उद्भवू नये यासाठीच्या उपाययोजना करणारी साहित्य देण्यात आली नाहीत. विजेची उपकरणे अतिशय दुरावस्थेत असल्यामुळे विजेची उपकरणे चालू करताना त्यातून करंट लागण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. कंपनीच्या आवारात विद्युत तारा यांचा कोणताही मेंटेनन्स केला जात नसल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली असून कंपनीत विजेचा शॉक लागून मोठी दुर्घटना घटना घडू शकते.
अग्निशामकची यंत्रणा कार्यान्वित नसून त्याबाबत कोणताही अग्निशामक यंत्रणेचा मेंटेनेस केला नसल्याने दुर्घटना घडल्यानंतर नागरिकांना आपला जीव गमवावा लागू शकतो. वेअर हाऊसचा मेंटेन करण्यासाठी गाडीच्या टपावर चढून कामगारांना बळजबरीने काम करायला सांगतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षितता कामगारांच्या बाबतीत नसल्याने कामगारांना धोका उद्भवू शकतो.
कामगारांसाठी कोणत्याही प्रथमोपचाराची अथवा मेडिकल बॉक्सची सुविधा कंपनीमध्ये नाही. महिला सफाई कामगारांसाठी कोणत्याही प्रकारची स्वच्छतागृहे नाहीत. पुरुषांसाठी असणारी स्वच्छतागृहे कामगारांच्या संख्येच्या प्रमाणात नाहीत. जी आहेत त्यांची अत्यंत दुरवस्था असून त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
कंपनीतून कामगारांना कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने कामगारांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. माहे मे 2023 च्या कालावधीत वाघोलीत कंपनी व गोडाऊन झाल्याच्या तीन घटना घडल्या असून त्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून त्या पार्श्वभूमीवर सिस्का कंपनीची चौकशी होऊन कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी या संबंधित कंपनीवर चौकशी करून कारवाई व्हावी.
“वाघोली गोडाऊन व कंपनी जळालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कंपनीची चौकशी करून कंपनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”
-सोमनाथ बनकर, सहाय्यक आयुक्त वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय
“कामगारांच्या पगार व बोनस मिळवून देण्यासाठी तातडीने कामगार उपायुक्त गीते यांनी योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहे. कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबत औद्योगिक सुरक्षा संचालनालय यांच्याकडे संपर्क साधण्यात यावा.”
-शैलेंद्र पोळ, अप्पर आयुक्त कामगार पुणे विभाग