“२४ तारखेपर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्या, अन्यथा…”; जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

Manoj Jarange Patil : – मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी गावात उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून आरक्षणासाठी महिनाभराचा अवधी देण्यात आला आहे. 14 ऑक्टोबरला जालन्यातील अंतरवाली सराटीमधील लाखो समर्थकांच्या उपस्थिती मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहिले होते. या सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांची तोफ आता पुणे जिल्ह्यात धडाडणार आहे. पुणे जिल्ह्यातील खेड आणि बारामती तालुक्यात जंगी सभा होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी ‘येत्या 24 तारखेच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. चालढकल करण्याचा प्रयत्न केल्यास मराठ्यांचं शांततेत सुरू असलेलं आंदोलन तुम्हाला पेलणार नाही,’ असा इशारा राज्य सरकारला दिला.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
“मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत संपत आहे. येत्या २४ तारखेपर्यंत राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायचा आहे. कुठलीही चालढकल करण्याचा प्रयत्न केला, तर शांततेत होणारं मराठा आंदोलन तुम्हाला पेलणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही तसूभरही मागे हटणार नाही,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे जालन्यातील कार्यकर्ते सुनील बाबुराव कावळे यांनी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावरून देखील त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “कावळे यांच्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार आहे. आमचा संयम सुटू देऊन नका. आमच्या कुटुंबातील एक सदस्य गेला. आम्ही त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.




