ताज महालचे उत्पन्न सर्वाधिकच, कोणार्क येथील सूर्यमंदिरांना तिसऱ्या क्रमांकाचे स्थान

Taj Mahal | Konark Surya Mandir – मुघल शासक औरंगजेबाची कबर वाचवण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारीची उपाययोजना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने करत आहे. केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गुरुवारी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
खरं तर औरंगजेबाच्या थडग्याच्या जतनाची जबाबदारी एएसआयची आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. अशा परिस्थितीत, ही कबर उध्वस्त करण्याबाबतच्या अलिकडच्या धमक्यांनंतर, भारतीय पुरातत्व विभागाने त्यांच्या वेबसाइटवर काही उपायांची माहिती दिलेली आहे.
गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले की, औरंगाबादमधील खुलदाबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर एएसआय संरक्षित आहे आणि त्याची माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. यासोबतच, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग सतत खबरदारीचे उपाय करत आहे.
या कबरीचे कोणतेही नुकसान होण्यापासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी हा विभाग समन्वय साधत आहे. कबरीभोवती १२ फूट उंच धातूचा पत्रा बसवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, घुसखोरीचा कोणताही प्रयत्न रोखण्यासाठी कुंपण घालण्यात आले आहे.
सरकारी सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबतच खासगी सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. तसेच नियमित अंतराने तपासणी आणि तपास केला जात आहे.
सर्वाधिक उपन्न ताजमधूनच
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, ताजमहाल हे देशातील तिकीट विक्रीतून सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे अनमोल वारसा स्थळ आहे. गेल्या पाच वर्षांत तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या कमाईच्या बाबतीत ताजमहाल अव्वलच आहे.
आग्र्यातील आग्रा किल्ला आणि दिल्लीतील कुतुबमिनार ही एएसआय संरक्षित वारसा स्थळांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात, तामिळनाडूतील मल्लपुरम आणि कोणार्क येथील सूर्यमंदिरांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कुतुबमिनार आणि लाल किल्ला दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते.





