Tahawwur Rana : आता भारत ठरवणार 26/11 च्या मास्टरमाइंडची शिक्षा; तहव्वुर राणाला उद्या भारतात आणणार

मुंबई : मुंबईवर २००८ साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आणि लष्कर ए तोयबाचा दहशतवादी तहाव्वूर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येत आहे. अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांनी त्याला विशेष विमानाने भारताकडे रवाना केले आहे. रात्री उशीरा किंवा उद्या पहाटेच्या सुमारास राणाला घेऊन येणारे हे विमान भारतात पोचण्याची शक्यता आहे.
सोमवारीच अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाला आव्हान देणारी राणाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर राणाच्या प्रत्यार्पणामध्ये काहीच अडथळा शिल्लक राहिला नव्हता. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये अशाच प्रकारची विनंती फेटाळली होती. आपल्याला पोटातील आतड्यांचा विकार आहे. यामुळे आतडी पोटातच फाटण्याचा धोका आहे, पार्किन्सन रोगामुळे आपल्याला स्थितीची समज होण्याचे प्रमाणही घटले आहे आहे आणि मूत्राशयाच्या कर्करोगाचा मोठा धोका आहे, असे राणाने यापूर्वी अमेरिकेतल्या कोर्टाला सांगितले होते
फेब्रुवारीमध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली होती. त्यावेळी घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना तहव्वुर राणाला भारताच्या स्वाधीन केले जाईल, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली होती. तेंव्हाच राणाचे प्रत्यार्पण लवकरच होणार हे निश्चित झाले होते. राणा हा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा सहकारी आहे, तो हा २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक होता. तो पाकिस्तानी वंशाचा व्यापारी, डॉक्टर आणि इमिग्रेशन उद्योजक आहे.
त्याचे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस यांच्याशी संबंध आहेत. अमेरिकेच्या ज्युरीने राणाला हल्ल्यांना प्रत्यक्ष मदत पुरवल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले होते, परंतु त्याला इतर दोन आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले आणि त्याला १० वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण कोविडची लागण झाल्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका केली गेली होती. भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी त्याला पुन्हा अटक केली गेली होती.





