‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम नट्टू काका यांचे निधन

मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेते घनश्याम नायक (नट्टू काका) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या वर्षी घनश्याम नायक यांना कर्करोगाचे निदान झाले होते. तेंव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली असून रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
घनश्याम नायक यांनी हिंदीसह इतर भाषांमधील जवळपास 350 हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी सलमान खानच्या ‘हम दिल दे चुके सनम’, ‘तेरे नाम’ यासारख्या सुपरहिट चित्रपटातही काम केले आहे. तसेच ‘चोरी चोरी’ आणि ‘खाकी’ या चित्रपटातही त्यांची छोटी भूमिका होती. तसेच नसीरुद्दीन शाह यांच्या ‘मासूम’ या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणूनही काम केले होते.
एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते, एकेकाळी मी फक्त 3 रुपयांमध्ये 24 तास काम करायचो. त्याकाळी इंडस्ट्रीमध्ये कामाचे जास्त पैसे मिळत नव्हते. पण मला कलाकारच बनायचे होते. अनेकदा मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नसायचे. अशावेळी शेजारी राहणारे आणि मित्र यांच्याकडे हात पसरावे लागत होते, असे घनश्यान नायक यांनी सांगितले.





