Taapsee Pannu: अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या दमदार अभिनयासोबतच स्पष्ट आणि बेधडक मतांसाठी ओळखली जाते. महिला-केंद्रीत चित्रपटांमधील भूमिकांमुळे चर्चेत असलेली तापसी आता बॉलिवूडमधील पीआर गेमवर टीका करताना दिसली आहे. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली की, गेल्या दीड-दोन वर्षांत इंडस्ट्रीतील पीआर गेम प्रचंड वाढला आहे. पूर्वी स्वतःला पुढे नेण्यासाठी पीआर केला जायचा, पण आता इतर कलाकारांना खाली पाडण्यासाठीही पैसे दिले जात आहेत, असं तिनं स्पष्टपणे सांगितलं. तापसी पुढे म्हणाली, “मला हे समजत नाही की एखाद्याचं यश दुसऱ्याच्या अपयशावर कधीपासून अवलंबून झालं? लोक चर्चेत राहण्यासाठी आपला खरा स्वभाव लपवून वेगळाच चेहरा दाखवत आहेत.” तिनं हेही स्पष्ट केलं की, “मी फक्त एखादा हिट चित्रपट मिळाल्यामुळे खूश होत नाही. मला माझी स्वतःची, ठाम आवाज असलेली ओळख हवी आहे. पैसे देऊन लेख छापून घेण्यापेक्षा, स्वतःवर आणि माझ्या माणसांवर पैसे खर्च करणं मला जास्त योग्य वाटतं.” वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर तापसीने 2010 मध्ये तेलुगू चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये ती ‘चश्मे बद्दूर’मधून झळकली. तिचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ असून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.