#T20WorldCup | कोहली व रोहित यांच्यातील वाद संघाला भोवतोय

दुबई – विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यातील वर्चस्वाचा वाद आजही संपलेला नाही व त्यांच्यातील या कुरघोडीच्या प्रयत्नांमुळेच संघालाही याची किंमत मोजावी लागत आहे. याबाबतचे संकेत बीसीसीआयमधील सूत्रांनी दिले आहेत.
2019 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेपासून या दोन खेळाडूंमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. त्याचाच परिणाम म्हणून रोहितने कोहलीची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला सोशल मीडियावर ब्लॉकही केले होते. ते प्रकरण खूप गाजलेही होते.
या वर्चस्ववादाचा फटका संघातील अन्य खेळाडूंनाही बसू लागला असून, यामुळेच विश्वकरंडक टी-20 स्पर्धेसाठीच्या संघात रवीचंद्रन अश्विनचा समावेश असूनही त्याला पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या अंतिम 11 खेळाडूंच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. या विश्वकरंडक स्पर्धेत या दोघांमधील वाद आणखीनच वाढल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या सराव सामन्यात रोहितला संघाबाहेर ठेवले गेले होते.
दुसऱ्या सराव सामन्यात कर्णधार कोहलीने विश्रांती घेतल्याचे सांगितले गेले. मात्र, प्रत्यक्षात त्यानेही मैदानात प्रवेश केला व त्यावेळी कर्णधार रोहित असूनही कोहलीच सर्व निर्णय घेताना दिसून आला. त्यामुळे या दोन खेळाडूंमधील सत्ता संघर्ष यंदाच्या स्पर्धेत आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.


