पिंपरी | रिपाइंच्या दोन गटांतील वादामुळे महायुतीची कोंडी

पिंपरी, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतलेला असतानाच मावळ लोकसभेच्या पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदार संघात महायुतीची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मधील वादामुळे मोठी कोंडी झाली आहे. दोन्ही गटातील वादाचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू नये, याकरिता पदाधिकार्यांना या पदाधिकार्यांची समजूत काढावी लागली. आता राष्ट्र्रीय अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी सोमवारी (दि.8) महायुतीच्या पदाधिकार्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीसाठी अजित पवार, चंद्रकांत पाटील, उदय सामंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत रिपाइं शहराध्यक्षांचा नामोल्लेख आणि व्यासपीठावर बसण्यास न बोलावल्याने एका गटाच्या पदाधिकार्यांनी या बैठकीतून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली.
उदय सामंत यांना या नाराजीची कुणकुण लागल्याने त्यांनी पदाधिकार्यांची भेट घेत, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. सामंत यांनी मध्यस्थी करत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याशी या पदाधिकार्यांची भेट घडवून या नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
एकीकडे हे नारजीनामा नाट्य सुरू असताना रिपाइंच्या समन्वय समितीने महायुतीच्या प्रचारात सक्रीय सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे. रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष माजी राज्यमंत्री राजा सरवदे यांच्या 17 जुलै 2023 च्या लेखी पत्रानुसार पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, शहराचा कारभार समन्वय समितीकडे सोपविण्यात आला असल्याचे या समितीचे म्हणणे आहे.
याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चार दिवसांपुर्वीच रिपाइं पदाधिकार्यांना महायुतीच्या प्रचारात सहभागी होण्याच्या सूचना केल्या असल्याची बाब माजी नगरसेविका व पक्षाच्या महिला प्रदेसाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांनी निदर्शनास आणुन दिली आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्वप्नील कांबळे यांनी मीच पिंपरी-चिंचवड शहराचा अध्यक्ष असून, माझी निवड लोकशाही पद्धतीने मतदानाच्या माध्यमातून झाली आहे. माझा कार्यकाळ पूर्ण झाला नाही, असे सांगत शहरातील एका कार्यक्रमात खासदार आठवले यांनी माझा शहराध्यक्ष असा उल्लेख केल्याने मीच शहराचा अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा तिढा आणखी वाढल्याचे चित्र आहे.





