#T20WorldCup #PAKvAUS #SemiFinal 2 | पाकिस्तानविरुद्ध आज ऑस्ट्रेलियाचे पारडे जड

दुबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (गुरुवार) दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. ( Pakistan face Australia in the second semi-final in Dubai ) या सामन्यातील विजयासह स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. मात्र, तरीही फलंदाजी व गोलंदाजीतील बलाबल पाहता ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड राहणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून पाकिस्तानने सलग विजय मिळवले आहेत. मात्र, भारताविरुद्धच्या सामन्यानंतर त्यांचे फलंदाजीतील सातत्य कमी झाले. तसेच गोलंदाजीतही त्यांना ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पाहता खूप कटाक्षाने कामगिरी करावी लागणार आहे. त्यांची फलंदाजी बळकट असली तरीही त्यात सातत्य केवळ कर्णधार बाबर आझम व माजी कर्णधार शोएब मलिक यांनीच दाखवले आहे.
महंमद रिझवान, फखर झमान आणि महंमद हाफिज यांनी धावा केल्या असल्या तरीही त्यात सातत्य नव्हते. त्यांची गोलंदाजी नव्या चेंडूवर शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व असीफ अली यांच्यावरच जास्त अवलंबून आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ पाहिला तर त्यांच्याकडे फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिनही क्षेत्रात बलाढ्य खेळाडूंचा भरणा आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून अपयशी ठरलेला सलामीवीर डेव्हीड वॉर्नर भरात आल्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांना त्याला रोखण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
कर्णधार ऍरन फिंच, स्टिव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, मार्कस स्टोनिस व मॅथ्यु वेड अशी भक्कम फलंदाजी त्यांच्याकडे आहे. तर गोलंदाजीत त्यांची मदार प्रमुख अस्त्र मिशेल स्टार्क याच्यावर राहणार आहे. त्यातच लेग स्पीन गोलंदाज ऍडम झम्पानेही यंदाच्या
स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली असल्याने पाकिस्तानच्या फलंदाजांना त्याच्या फसव्या गोलंदाजीचा मुकाबला करणे जड जाणार आहे. त्यातच पॅट कमिन्स व जोश हेझलवूडचा वेगही या सामन्यात पाकिस्तानसाठी धोकादायक ठरू शकतो.
वॉर्नरची खेळी निर्णायक ठरेल
जागतिक क्रिकेटमध्ये सध्याच्या कालखंडात सर्वात धडाकेबाज सलामीवीर फलंदाज अशी ख्याती असलेला डेव्हीड वॉर्नर भरात आल्यामुळे ऑस्ट्रेलियाची चिंता दूर झाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या आयपीएल स्पर्धेत साफ अपयशी ठरलेल्या वॉर्नरला सूर गवसला असल्याने ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी होइल त्यामुळेच वॉर्नरचीच कामगिरी निर्णायक ठरणार आहे.





