T20 World Cup 2024 (IND vs USA) : अर्शदीप सिंगच्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद….

T20 World Cup 2024 (IND vs USA) :- भारत आणि अमेरिका यांच्यातील सामन्यात भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या गोलंदाजीने अमेरिकेच्या फलंदाजांना पाठोपाठ धक्के दिले. टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील २५ व्या सामन्यात अर्शदीपने पहिल्याच षटकापासून धोकादायक गोलंदाजी केली. त्याने पहिल्याच चेंडूवर अमेरिकेचा फलंदाज शायान जहांगीरला पायचित करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने अँड्रिस गॉसला २ धावांवर बाद केले. या शानदार कामगिरीच्या जोरावर अर्शदीप सिंगने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) टी-२० विश्वकरंडकात पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. आजपर्यंत अर्शदीपच्या आधी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती. जर जगभरातील गोलंदाजांबद्दल बोलायचे, तर बांगलादेशचा गोलंदाज मशरफी मुर्तझा याने पहिल्याच चेंडूवर बळी घेऊन टी-२० विश्वकरंडाकत विक्रम केला होता. २०१४ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने हा विक्रम केला होता.
तसेच अफगाणिस्तानचा गोलंदाज शापूर झाद्रानने २०१४ मध्ये हाँगकाँगविरुद्ध हा विक्रम केला होता. नामिबियाचा गोलंदाज रुबेन ट्रम्पेलमनने हा पराक्रम दोनदा केला आहे. २०२१ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध आणि २०२४ मध्ये ओमानविरुद्ध त्याने ही कामगिरी केली आहे. आता अर्शदीप सिंग न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात या अनोख्या यादीत सामील झाला आहे. ही कामगिरी करणारा तो जगातील एकूण चौथा गोलंदाज ठरला आहे.
टी-२० विश्वकरंडकात सामन्यातील पहिल्या चेंडूवर बळी घेणारे गोलंदाज
– मशरफी मोर्तझा (बागलादेश) विरुद्ध अफगाणिस्तान, २०१४
– शापूर झाद्रान (अफगाणिस्तान) विरुद्ध हाँगकाँग, २०१४
– रुबेन ट्रम्पलमन (नामिबिया) विरुद्ध स्कॉटलंड, २०२१
– रुबेन ट्रंपेलमन (नामिबिया) विरुद्ध ओमान, २०२४
– अर्शदीप सिंग (भारत) विरुद्ध अमेरिका, २०२४
अर्शदीप सिंग आहे भरात…
अर्शदीप सिंग या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो सतत भेदक गोलंदाजी करताना दिसत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ३१ धावा देताना इमाद वसीमला बाद करत महत्त्वाचा बळी घेतला. त्यानंतर अर्शदीप सिंगने अखेरच्या षटकात १८ धावा वाचवून संघालाला विजय मिळवून दिला. आयर्लंडविरुद्धही त्याने दमदार गोलंदाजी केली आणि ३५ धावांत २ बळी घेतले होते.





