‘करोना’पुढे यंत्रणा तोकडी

महापालिकेच्या रुग्णालयातील व्हेंटिलेटर बेड संपले
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने साडेसहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शहरात उपाचाराधीन रुग्णांची संख्या अडीच हजाराहून अधिक आहे. शहरातील वाढत्या करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन विदाऊट ऑक्सिजन बेड संपले आहेत. तसेच महापालिकेने इतरत्र केलेल्या व्यवस्थेतही अवघे 226 बेड शिल्लक असून आता करोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात पैसे मोजावे लागणार आहेत.
शहरामध्ये महापालिकेच्या वायसीएम, भोसरीतील जिजामाता रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यापैकी वायसीएम रुग्णालयामध्ये 610 आयसोलेशन बेड आहेत. ते सर्व फुल्ल झाल्याने एकही बेड शिल्लक नाही. विलगीकरण कक्षामध्ये 300 बेडची क्षमता आहे. त्यामध्ये 263 बेड शिल्लक आहेत. परंतु या बेड्सना ऑक्सिजनची सुविधा असल्याने हे बेड श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी आहेत. आयसीयूमध्ये विना व्हेंटिलेटरचे 50 बेड आहेत, त्यापैकी 19 बेड शिल्लक आहेत. व्हेंटिलेटरसह 12 बेड असून त्यापैकी एकही बेड शिल्लक नाही. म्हणजेच अत्यवस्थ रुग्णाला वायसीएम रुग्णालयात प्रवेश मिळणार नाही.
मोहननगरर येथील ईएसआय रुग्णालयामध्ये 100 बेड आहेत. त्यापैकी 77 बेडवर रुग्ण असून फक्त 23 बेड शिल्लक आहेत. भोसरी येथील नवीन रुग्णालयामध्ये 80 बेड आहेत. हे रुग्णालय पूर्ण फूल्ल झाले आहे. बालेवाडी याठिकाणी उभारलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 240 बेड आहेत. याठिकाणीही एकही बेड शिल्लक नाही. वायसीएम व्यतिरिक्त महापालिकेच्या एकाही रुग्णालयात आयसीयू व व्हेंटिलेटरची सोय नाही. त्यामुळे अत्यवस्थ रुग्ण असेल तर त्याला आता खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. पालिकेने खासगी रुग्णालयातील काही बेड आरक्षित केले आहेत. मात्र यासाठी रुग्णांना पैसे मोजावे लागणार आहेत. शहरातील आदित्य बिर्ला रुग्णालयामध्ये 130 बेड आहेत. त्यापैकी 100 साध्या बेडपैकी फक्त 16 बेड शिल्लक आहेत.
ऑक्सिजन विरहित 25 बेडपैकी 21 बेड, ऑक्सिजनसहित 25 बेडपैकी 15 बेड शिल्लक आहेत. तर 30 व्हेंटिलेटरपैकी 29 शिल्लक आहेत. लोकमान्य हॉस्पिटलमध्ये सर्व मिळून 61 बेड असून ते सर्व रिकामे आहेत. संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये 70 बेडपैकी 65 बेड रिकामे आहेत. यामध्ये 10 आयसीयू व 10 आयसीयू सोबतच व्हेंटिलेटर असलेल्या बेडचा समावेश आहे. स्टर्लिंग रुग्णालयात 55 बेड आरक्षित असून ते रिकामे आहेत. डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात 300 साध्या बेडपैकी 201 रिकामे आहेत. ऑक्सिजनसहित 80 बेडपैकी 78, ऑक्सिजनसहित आयसीयूपैकी 6 रिकामे आहेत. तर 5 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. लोकमान्य हॉस्पिटलमध्ये साधा बेड एकही शिल्लक नाही. व आयसीयू व व्हेंटिलेटर 5-5 शिल्लक आहेत. निरामय रुग्णालयात 72 बेड आरक्षित आहेत.






