सीरियात एचटीएस कमांडर परराष्ट्र मंत्री घोषित

दमास्क, (सीरिया) – सीरियातल्या नवीन हंगामी सरकारने देशाचा परराष्ट्रमंत्री म्हणून हयात तहरिर-एल-शाम या बंडखोर संघटनेचा कमांडर मुरहाफ अबू कसारा याच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. बशर अल-असाद यांचे सरकार पाडण्यात कासरा याचा मोठा वाटा होता, असे मानले जाते आहे.
अबू कसारा याला नॉम डे ग्युरे अबू हसन ६०० या टोपणनावाने देखील ओळखले जाते, तो इस्लामवादी हयात तहरीर अल-शाममधील एक वरिष्ठ कमांडर आहे. सीरियातल्या क्रांतीदरम्यान त्याने अनेक लष्करी कारवायांचे नेतृत्व केले होते.
सीरियाचा पदसिद्ध सर्वेसर्वा नेता अहमद अल-शारा याने सीरियाच्या लष्करी नेतृत्वाशी नुकतीच चर्चा केली आणि नवीन सीरियामध्ये लष्करी संस्थांच्या फेरउभारणीबाबत विचारविनिमय केला. या बैठकीच्यावेळी अबू कसारा हा देखील अल-शारा याच्यासमवेत उपस्थित होता. अल-शारा याला देखील बंडखोर संघटनेमध्ये नॉम डे ग्युरे अबू मोहम्मद अल-गोलानी म्हणून संबोधले जाते.
शारा याने गेल्या अलिकडेच सीरियाच्या हंगामी पंतप्रधानपदी मोहम्मद-अल-बशीर यांची नियुक्ती केली आहे. देशातल्या संरक्षण मंत्रालयाची फेरउभारणी केली जाईल. या नव्या संरक्षण मंत्रालयामध्ये बंडखोर संघटनेतील आणि असद यांची साथ सोडलेल्या सैन्यदलातील अधिकाऱ्यांचा समावेश असेल, असे बशीर यांनी म्हटले होते.
बशीर यांनी स्वतः पूर्वी सीरियामधील वायव्येकडील इडलिब प्रांतात एचटीएस-संलग्न प्रशासनाचे नेतृत्व केले होते. हंगामी सरकार ३ महिने देशाचे नेतृत्व करेल असे त्यांनी म्हटले होते. मात्र त्यानंतर देशाचे शासन कसे असेल, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.





