सहजीवन हाच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याचा मंत्र

पुणे – सहजीवन हाच मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्याचा मंत्र आहे, असा संदेश देत राज्य सरकारच्या वनविभागामार्फत एक ते सात ऑक्टोबर या कालावधीत विविध स्तरावर पिरंगुट येथे मुळशी वन विभागाकडून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
स्थानिक शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, लोकवस्तीची ठिकाणे आदी ठिकाणी वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाबाबत तसेच मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी होण्यासाठी विविध प्रकारे स्थानिकांमध्ये वन्यप्राण्यांबाबत जागरूकता वाढवून हा सप्ताह साजरा केला जात आहे.
तीन ऑक्टोबर रोजी मुळशी वन विभागाच्या माध्यमातून तसेच “ऍनिमल रेस्क्यू टीम’ बावधन पुणे यांच्यामार्फत सर्पदंश, जखमी वन्यप्राणी प्रथमोपचार, शेतात काम करताना घ्यावयाची काळजी, मानव-वन्यजीव संघर्ष, वने- वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन पिरंगुट भागातील महाविद्यालयांमध्ये जागृती करण्यात आली.
याशिवाय पर्यावरणविषयक कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात येऊन बक्षिसांचे वितरण केले. हे उपक्रम मुख्य वनसंरक्षक पुणे वनवृत्त एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक पुणे महादेव मोहिते, सहा. वनसंरक्षक पुणे मयूर बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल नंदकुमार शेलार, कल्याणी मच्चा यांनी राबवला.
बिबट प्रवण क्षेत्रात घ्यायची काळजी
- रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळा.
- रात्रीच्या वेळी बाहेर जाताना टॉर्च वापरा.
- रात्रीच्या वेळी लहान मुल आणि वृद्धांना एकटे सोडू नका.
- पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा.
शेतात काम करताना घ्यायची काळजी
- जंगल भागातील शेतात एकट्याने काम करणे टाळा.
- शेताला काटेरी झाडीचे कुंपण घाला, बांधावर काटेरी वनस्पतींची लागवड करावी.
- शेतात जाताना काठी, मोबाइल टॉर्च वापरणे.
काम करताना सतत आवाज, मोबाईलवर गाणे सुरू ठेवावे.





