“आम्ही 1947 पेक्षा वाईट परिस्थितीत…” ; दिल्ली जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

Syed Ahmed Bukhari । दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील मुस्लिमांशी बोलण्याचे भावनिक आवाहन केले आहे. मशिदींच्या सर्वेक्षणावरून देशात जातीय तणाव वाढत असताना त्यांनी हे आवाहन केले. बुखारी म्हणाले की, “पंतप्रधान मोदींनी आपल्या पदाचा योग्य वापर करून मुस्लिमांची मने जिंकली पाहिजेत.”
इमाम बुखारी यांनी पंतप्रधान मोदींना असेही सांगितले की, “तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात त्या खुर्चीला न्याय द्या. मुस्लिमांची मने जिंका आणि देशाचे वातावरण बिघडवण्याचा सतत प्रयत्न करणाऱ्या बदमाशांना रोखा.” ते पुढे म्हणाले की, “आज 1947 पेक्षाही वाईट परिस्थिती निर्माण झाली असून ही परिस्थिती देशाच्या भवितव्याची चिंता निर्माण करते. देश कोणत्या दिशेने जाईल हे कोणालाच माहीत नाही, “असे म्हणताना बुखारींना अश्रू अनावर झाले.
जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर तातडीने पावले उचलण्याचे आवाहन
बुखारी यांनी पंतप्रधान मोदींना तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले. हा तणाव दूर करण्यासाठी तीन हिंदू आणि तीन मुस्लिमांना चर्चेसाठी बोलावण्याची सूचना त्यांनी केली. ते म्हणाले, “देशातील वातावरण सुधारण्यासाठी हे संभाषण अत्यंत आवश्यक आहे.” विशेषतः उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील एका मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचारानंतर हे आवाहन करण्यात आले आहे.
संभल ,अजमेरमधील मशिदींच्या सर्वेक्षणानंतर तणावाची परिस्थिती Syed Ahmed Bukhari ।
19 नोव्हेंबर रोजी संभल येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान तणाव वाढला होता. जेव्हा याचिकेच्या आधारे दावा करण्यात आला की या ठिकाणी पूर्वी हरिहर मंदिर होते. 24 नोव्हेंबर रोजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान दगडफेकीची घटना घडली, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेने जातीय तेढ आणखी वाढली.
अजमेर शरीफ दर्ग्यावरही वाद निर्माण झाला होता Syed Ahmed Bukhari ।
अजमेरमध्येही एक याचिका दाखल करण्यात आली असून त्यात अजमेर शरीफ दर्गा शिवमंदिराच्या वर बांधल्याचा दावा करण्यात आला आहे. ही याचिका स्वीकारून राजस्थान न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), अजमेर दर्गा समिती आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला नोटीस बजावली. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
मंदिर-मशीद वादावर बुखारी काय म्हणाले?
बुखारी पुढे म्हणाले की, “आता देशात जातीय सलोखा वाढवण्याची आणि मंदिर-मशीद वाद मागे टाकून पुढे जाण्याची वेळ आली आहे. या वादांमुळे देशातील वातावरण बिघडत असून भविष्य अनिश्चित” असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.





