कृष्णा नदीवर उभारणार झुलता पूल : डॉ. विश्वजीत कदम

सांगली – श्री क्षेत्र औदुंबर येथे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. या परिसराला पुराच्या काळात मोठ्या प्रमाणावर फटका बसतो, या अनुषंगाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून औदुंबर येथे कृष्णा नदीवर झुलता पूल उभारण्यात येईल. हा या प्रकारचा जिल्ह्यातील पहिलाच पूल ठरणार आहे. त्यामुळे हा पूल सर्वांचे आकर्षण ठरेल, अशी माहिती राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली.
सन 2017-18मधील प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत पलूस तालुक्यातील औदुंबर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार संजय पाटील, तहसीलदार निवास ढाणे उपस्थित होते.
विश्वजीत कदम म्हणाले, श्री क्षेत्र औदुंबर येथे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. त्यादृष्टीने येथील रस्ते मोठे व रुंद असणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची चांगली सोय व्हावी, यासाठी येथील जुने गेस्ट हाऊस निर्लेखित करून अद्ययावत नवीन गेस्ट हाऊस बांधण्यात येईल.
अंकलखोप मुख्य चौकापासून औदुंबर देवस्थानापर्यंत नागरिकांना येण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व नागरिकांच्या मागणीनुसार भारती विद्यापीठातर्फे दोन इलेक्ट्रिक गाड्या लवकरच प्रदान करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.





