सध्या ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे प्रमाण वाढले आहे. स्विगी, झोमॅटो आणि इतर ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲपवरून आपण ऑनलाईन फूड मागवतो. अशातच आता दारूची सुविधा देखील घरपोच आली तर? विचार करून पाहा… होय, तळीरामांसाठी आता गुड न्यूज समोर आली आहे. स्विगी, झोमॅटो आणि बिगबास्केट सारख्या प्लॅटफॉर्मवर लवकरच बिअर, वाइनसारख्या कमी अल्कोहोलयुक्त दारूची होम डिलिव्हरी करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे. मात्र देशातील सर्व राज्यात नव्हे तर काही राज्यातच याचा प्रयोग केला जाणार आहे. ‘या’ राज्यात होणार दारूची होम डिलिव्हरी नवी दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, गोवा आणि केरळ या सात राज्यात पथदर्शी प्रकल्पाचा विचार आम्ही करत आहोत, असं उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या फक्त ओडिसा आणि पश्चिम बंगाल या दोनच राज्यात दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी आहे. ऑनलाइन डिलिव्हरीमुळे या दोन राज्यातील मद्यविक्रीचं प्रमाण 20 ते 30 टक्के वाढल्याचं निदर्शनात आलं आहे. महाराष्ट्रात होणार दारूची होम डिलिव्हरी? तरुणांमध्ये वाढत असलेलं अल्कोहोलचं प्रमाण हा विषय ऐरणी वरती आला आहे. त्यामुळे विविध समाज माध्यमातून दारूबंदी विषयीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील दारूबंदी होणार का? असा सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्रात सध्या वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.