Chhaya Kadam : वेगाने धावणारी पावलं… सहावारी साडी…; रवी जाधव यांच्या फुलवराचा टीझर पाहिल्यानंतर छाया कदम यांची खास पोस्ट
Chhaya Kadam : अभिनेत्री छाया कदम यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फुलवराचा टीझर शेअर केला असून, रवी जाधव यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Chhaya Kadam : नुकताच दिग्दर्शक रवी जाधव यांच्या फुलवरा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या चित्रपटाचे कथानक लावणीवर आधारित असल्याचे टीझर पाहल्यानंतर लक्षात येते. यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री छाया कदम यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फुलवराचा टीझर शेअर केला असून, रवी जाधव यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
छाया कदम पोस्टमध्ये म्हणतात चित्रपटाच्या दुनियेत अभावानेच अशी जिव्हाळ्याची, आपलीशी वाटणारी आणि प्रेमाची माणसं भेटतात. जी प्रत्येक प्रसंगात आपल्या सोबत असतात. त्यांच्या असण्याचा एक वेगळाच आधार असतो. ज्यांच्यासोबत काम करावं असं मनापासून वाटतं, अशी ही सुंदर जोडी! रवी आणि मेघना
View this post on Instagram
एक जण आपल्या मनात सुचलेलं, डोक्यात आकार घेत असलेलं स्वप्न पडद्यावर उतरवण्यात मग्न. तर दुसरी अत्यंत खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहणारी! रवी, तुझे चित्रपट, त्यातली गाणी, व्यक्तिरेखा, गोष्ट, रंगसंगती. सगळंच एक वेगळं गारूड घालणारं असतं. पुन्हा एकदा इतिहास घडवणारा चित्रपट अनुभवायला मिळणार, असा मनापासून विश्वास वाटतोय! अशा शब्दांत आपली भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
नऊवारी साड्यांचा घोळ… त्यात अडकणारी, तरीही वेगाने धावणारी पावलं… सहावारी साडी… पाण्यात भिजलेली, चिखलात माखलेली पावलं… वेगवेगळ्या घुंगरांचा नाद आणि जोडीला अस्सल मराठमोळी वाद्यं…काहीतरी फारच भारी घडतंय! काहीतरी असं, जे मनावर गारूड घालतंय…काट्याकुट्यांतून, चिखल-पाण्यातून धावणारी ही लावणी… तिचा बाज, तिचा थाट आणि तिचा संघर्ष! सखी माझी लावणी…! असेही छाया कदम यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सने निर्मिती केली असून, जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





