Sugar Price Hike : गोडवा महागला! चहाची तल्लफही खिशाला चटका देणार
Sugar Price Hike : साखर, दूध, तूप आणि खव्याच्या दरवाढीचा फटका

पिंपरी – श्रावण महिना सुरू झाल्याने सणांची चाहूल लागली आहे. बाजारपेठा सजू लागल्या आहेत. मात्र, यंदा सणांचा गोडवा सर्वसामान्यांच्या खिशाला चटका देणार आहे. साखर, दूध आणि तुपाच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम मिठाईच्या किमतीवर झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मिठाईच्या दरात तब्बल २० ते ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
साखरेच्या दरवाढीने सर्वाधिक फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी ३५ ते ४० रुपये किलो असलेली साखर आता ८२ रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. तर म्हशीचे दूध ९० ते १०० रुपये लिटरवर गेले आहे. तुपाचे दरही ७०० ते ८०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. खवा, पनीर आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे मिठाई तयार करण्याचा खर्च वाढला आहे. त्याचा भार आता ग्राहकांच्या खिशावर पडत आहे.
मिठाईचे दरही भडकले
काजूकतलीचा भाव सध्या सुमारे १,३०० ते १,४०० रुपये किलो आहे. पेढे ७६० ते ८०० रुपये किलोवर आहेत. मोतीचूर लाडू ५०० ते ५५० रुपये, तर रसमलाई ७०० ते ७५० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. मिठाईच्या प्रकारानुसार दरात फरक आहे. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी जवळ येत असल्याने मिठाईची मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
रोजचा चहाही महाग
मिठाईचा खर्च अधूनमधून होतो. मात्र, चहा रोजचा आहे. साखर आणि दुधाचे दर वाढल्याने टपरीवरील चहाचा उत्पादन खर्चही वाढला आहे. काही दिवसांपूर्वी चितळे गायीचे दूध ६२ रुपये लिटर होते. आता ते ६४ रुपये लिटर झाले आहे. त्यामुळे चहाच्या दरातही आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही चहा विक्रेत्यांनी १०-१२ रुपयांचा मिळणारा चहा आता १५ रुपये केला आहे.
साखर, दूध, तूप आणि खव्याचे दर वाढले आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने मिठाईच्या किमतीत २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ करावी लागली,” अशी माहिती मिठाई विक्रेत्यांनी दिली. सणांचा उत्साह कायम असला तरी वाढत्या महागाईमुळे ग्राहकांना खरेदीचे नियोजन जपून करावे लागणार आहे.
‘Chatron Ki Gunj’: राहुल गांधींसमोर उमटली ‘छात्रों की गुंज’ ; संवादातून युवतींनी मांडल्या व्यथा





