‘Chatron Ki Gunj’: राहुल गांधींसमोर उमटली ‘छात्रों की गुंज’ ; संवादातून युवतींनी मांडल्या व्यथा
'Chatron Ki Gunj':

‘Chatron Ki Gunj’: लोकसभेतील विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांनी युवतींशी संवाद साधत त्यांना प्रश्न विचारात त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. युवतींनीही अन्याय, अत्याचाराबाबतच्या घटनांचे वास्तव व मन हेलावून सोडणाऱ्या, थक्क करणाऱ्या धक्कादायक व्यस्था मांडल्या.
एआयएसएसएमएस च्या मैदानावर छात्रों की गुंज, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी युवतींशी संवाद साधला.
कोटा, डेहराडून आणि प्रयागराजनंतर पुण्यात छात्रों की गुंज हा देशातील चौथा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राहुल गांधी यांचे व्यासपीठावर सांयकाळी ७:३० वाजता आगमन झाले. त्यानंतर त्यांनी युवतींशी एक तास संवाद साधला. यात प्रामुख्याने पुणे, पालघर, गडचिरोलीतील युवतींनी त्यांच्याकडे विविध प्रकारच्या व्यथा मांडल्या. गांधी यांनी युवतींना काही प्रश्न विचारुन त्यांची उत्तरेही जाणून घेतली.
राहुल गांधी यांच्यापुढे निशा नावाच्या युवतीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. आदिवासी विद्यार्थ्यांचे मांजरी बु. येथे उपोषण सुरू असल्याचे नमूद करीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन निशाने हिने राहुल गांधी यांच्याकडे दिले.
आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृहातील सुविधांची वाणवा. त्याचा विद्यार्थ्यांना होत असलेला त्रासही निशाने मांडला. आदिवासी विकास विभागांच्या मंत्र्याची शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावर ते मंत्री सॉरी म्हणाले. मी काही करू शकत नाही हे मुख्यमंत्र्यांच्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आदिवासी विकास मंत्र्यांनी प्रश्न निकाली लावत येत नसतील पद मंत्री पद सोडावे, अशी मागणीही निशाने केली. राहुल गांधी यांनी आंदोलन स्थळी का बोलवत नाही, असे विचारले असता निशाने त्यांना आमंत्रण दिले. यावर राहुल गांधी यांनी निशाला मी तिथे येतो, यामुळे दबाव वाढेल, असे म्हटले.
नेहा राठोड या युवतीनेही व्यथा मांडली. ती म्हणाली की, सरकारला प्रश्न विचारते ते त्यांना पसंत नाहीत. त्यामुळे मला कित्येक शिव्या दिल्या जातात आणि गुन्हे दाखल केले जातात. महिलांना ही कसली वागणूक आहे? लोकशाहीत पंतप्रधानांना प्रश्न विचारल्यावर शिव्या मिळत आहेत? याबाबत नेहाने राहुल गांधींना सवाल विचारला. तसेच, एका गाण्यावरुन आपल्याला पोलिसांकडून, गावातील लोकांकडून त्रास झाल्याचेही तिने स्पष्ट सांगितले. राहुल गांधी यांनी तिला उत्तरही दिले. शालीनी नावाच्या युवतीने एमपीएससीच्या पेपर फुटीची व्यस्था मांडली.
* कार्यक्रमाला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
* राहुल गांधी झिंदाबादच्या घोषणा
* इस बार राहुल.., असे फलक युवतींचा हाती
* राहुल गांधी सोबत सेल्फी काढण्यांचा आनंद
* मोबाइलच्या प्लश लाइटद्वारे युवतींकडून स्वागत
राजकीय भाष्य टाळले…
छात्रों की गुंज हा कार्यक्रम कोणत्याही एका ठराविक पक्षांसाठी नव्हता. सर्वांसाठी तो खुला ठेवण्यात आला होता. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात युवतींचे प्रश्न जाणून घेतले. संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य करण्याचे टाळले.





