Baramati : सोमेश्वरच्या सभासदांची दिवाळी गोड
Baramati : मागील गळीत हंगामासाठी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीतील उसाला प्रतिटन ३,८०० रुपये, फेब्रुवारी महिन्यातील उसाला ३,९०० रुपये, तर मार्च महिन्यातील उसाला प्रतिटन ४,००० रुपये अंतिम दर निश्चित केला होता. कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन ३,४०० रुपये दर ठरविला होता.

सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सभासद शेतकरी, बिगरसभासद ऊस उत्पादक आणि कामगारांची दिवाळी गोड केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागील गळीत हंगामातील ऊसदराची उर्वरित रक्कम, सभासदांच्या ठेवींवरील व्याज, कामगारांचा बोनस, दिवाळी भेट, वेतनवाढीचा फरक वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आणि कामगारांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दिलासा मिळाला आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
मागील गळीत हंगामासाठी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीतील उसाला प्रतिटन ३,८०० रुपये, फेब्रुवारी महिन्यातील उसाला ३,९०० रुपये, तर मार्च महिन्यातील उसाला प्रतिटन ४,००० रुपये अंतिम दर निश्चित केला होता. कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन ३,४०० रुपये दर ठरविला होता. त्यानुसार सभासद व बिगरसभासद ऊस उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपयांप्रमाणे एकूण ६०.११ कोटी रुपये, तर कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे ९६ लाख रुपये वितरित करण्यात आले.
दरम्यान, या हंगामास १५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून, सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी कारखान्याने नियोजन केले आहे.
ठेवींवरील व्याज
सभासदांच्या ठेवी व त्यावरील व्याजापोटी २४.१५ कोटी रुपये, तर २०२३-२०२४ मधील ठेवींवरील चार कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. कामगारांना १५ टक्के बोनसपोटी ३.३३ कोटी रुपये, दिवाळी भेट म्हणून २९ लाख रुपये, वेतनवाढीच्या पहिल्या हप्त्यापोटी १.८४ कोटी रुपये, तर रजेच्या पगारापोटी २८ लाख रुपये दिले आहेत. या निर्णयामुळे कारखान्याशी संबंधित शेतकरी आणि कामगारांना सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
४३ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन
मागील गळीत हंगामात कारखान्याने १२ लाख ९८ हजार ५५९.३५७ टन उसाचे गाळप केले. १२.२७ टक्के साखर उताऱ्याने १५ लाख ५७ हजार ६५० साखर पोत्यांचे उत्पादन झाले. को-जनरेशन प्रकल्पातून १२ कोटी ५३ लाख ४४ हजार ६८० युनिट वीज निर्मिती करण्यात आली. डिस्टिलरी प्रकल्पातून ८६ लाख २५ हजार १ लिटर अल्कोहोल, तर ४३ लाख ८२ हजार ५६९ लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले.





