महिला आयोगाने विभव कुमारला समन्स बजावले, स्वाती मालीवाल यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप

Swati Maliwal । राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय सचिव विभव कुमार यांना समन्स बजावला आहे. महिला आयोगाने विभव कुमार यांना शुक्रवारी (१७ मे २०२४) सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी मंगळवारी (१४ मे २०२४) सांगितले होते की,’आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणी आवाज उठवला पाहिजे.’
NCW summons Bibhav Kumar, former PS to Delhi CM Arvind Kejriwal to appear before the National Commission for Women tomorrow.
Bibhav Kumar has been accused of assaulting AAP MP Swati Maliwal at the CM’s residence in Delhi. pic.twitter.com/TcngrC8vY2
— ANI (@ANI) May 16, 2024
दरम्यान, विभव कुमार यांनी केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणावरून भाजप आपवर हल्लाबोल करत आहे. अलीकडेच आप नेते संजय सिंह म्हणाले की, ‘स्वाती मालीवाल अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी थांबल्या होत्या आणि यादरम्यान विभव कुमारने त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि आम्ही त्याचा निषेध करतो. स्वाती मालीवाल प्रकरणाबाबत संजय सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला. मणिपूरमध्ये महिलांसोबत इतकं काही घडलं तेव्हा पंतप्रधान मोदी गप्प राहिले. महिला कुस्तीपटू विरोध करत असताना ते गप्प होते.’ असेही ते म्हणाले आहे.
ते पुढे म्हणाले की, मालीवाल यांच्या प्रकरणी ‘आप’ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशात भाजपने यावर राजकारण करू नये. इतर सर्व मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे.




