पुणे | स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन २९ सप्टेंबरला?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रद्द झालेला पुणे दौरा आता दि. २९ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. मोदी यांच्या सभेसाठी एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर केलेल्या तयारीवर पाणी पडल्याने उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, केलेली तयारी तशीच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या साऱ्या प्रकारामुळे पुणे मेट्रो प्रशासनावर टीका केली जात आहे. तर, पुणे मेट्रोचे सहाव्यांदा उद्घाटन कशासाठी? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत. तर, राजकीय पक्षांनीही आक्रमक भूमिका घेत थेट मोदींवरच टीका केली आहे.
मोदींच्या या दौऱ्यात २२ हजार कोटींपेक्षा जास्त प्रकल्पांची सुरूवात करण्यात येणार होती. त्यासाठी मेट्रो स्टेशन आणि सभास्थानी जय्यत तयारी करण्यात आली होती. फुलांचे डेकोरेशन आणि अन्य सजावट करण्यात आली होती.
बुधवारी पावसामुळे अक्षरश: सभास्थान जलमय झाले होते. त्यामुळे महापालिका, जिल्हा प्रशासन आणि महामेट्रोतर्फे मुरूम, खडी टाकून, तसेच डांबरीकरण करून चिखलमय झालेला भागावर कव्हर करण्याचे काम रात्रभर केले जात होते.
तसेच सभास्थानी चिखल झाल्याने तेथे खुर्च्या ठेवणेही कठीण होते, त्यामुळे तेथे लोखंडी अॅंगल्सवर फळ्या ठेवून रॅम्प बनवण्याचे कामही रात्र करण्यात आले. सकाळपर्यंत सभास्थान पूर्णपणे तयार करण्यात आले होते.
४० हजार लोकांना बसता येईल अशी सोय करण्यात आली होती. सकाळी केवळ स्टेजवरील फुलांचे डेकोरेशन करण्याचे काम सुरू होते. गुरूवारी सकाळपर्यंत मोदी येणार असेच चित्र होते. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी सतत संपर्कही केला जात होता.
मोदींचा दौरा रद्द होऊ नये यासाठी शहरातील प्रमुख पदाधिकारी, खासदार, मेट्रोचे अधिकारी यांच्याकडून प्रयत्नही केले जात होते.
मात्र, हवामानशास्त्र खात्याने गुरूवारीही दुपारनंतर मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पंतप्रधान कार्यालयाने दौरा रद्द झाल्याचे जिल्हा प्रशासनाला कळवले. त्यामुळे या सगळ्या झालेल्या तयारीवर पाणी पडले.
गणेश कला क्रीडासाठीही प्रयत्न
एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर अशी परिस्थिती झाल्याने गणेश कला क्रीडा येथे तयारी करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र तेथेही गळती असल्याने काही तासांमध्ये ते दुरुस्त होणे शक्य नाही. त्यामुळे तेथेही तयारी करणे शक्य झाले नाही. अखेर हा दौराच रद्द करण्यात आला.





