स्वारगेट प्रकरणातील पीडितीने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; म्हणाली आरोपीला…

पुणेः स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याच्या घटनेने संबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळून आली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. गाडेची पोलीस कोठडीतील मुदत संपली असून त्याची रवानगी आता येरवडा कारगृहात करण्यात आली आहे. पीडित तरुणीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्या विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची सोमवारी मुंबईत जाऊन भेट घेतली.
यावेळी पीडितेने आरोपीला कठोर शिक्षा मिळावी याची मागणी केली आहे. तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. तर पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली असल्याची माहिती आहे. पीडित तरुणीची शिंदे आणि गोऱ्हे यांनी तब्यतेची विचारपूस केली. राज्य सरकार महिला सुरक्षा आणि न्यायासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी या दिवशी बंद असलेल्या एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत यासंदर्भात बैठक घेऊन बसस्थानकाचे अॅाडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बसस्थानकात सुरक्षा आणि इतर सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले होते.
स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणात न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडे पाठविलेल्या नमुन्यांच्या आधारे आरोपी दत्तात्रय गाडेच्या डीएनए चाचणीचा अहवाल पोलिसांना अद्याप प्राप्त झालेला नाही. डीएनए चाचणी अहवाल मिळताच, एका आठवड्यात आरोपपत्र दाखल केले जाईल, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितले आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. ससून रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल आणि बसच्या न्यायवैद्यक तपासणीचा अहवाल मिळवला आहे. पंधरा दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे उद्दिष्ट पोलिसांनी ठेवले होते. मात्र, ‘डीएनए’ चाचणीचा अहवाल प्राप्त न झाल्याने आरोपपत्र दाखल करण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोबाईलचा शोध सुरूच
आरोपी दत्तात्रय गाडेचा स्वारगेट बसस्थानकासह अहिल्यानगर, शिरूर येथे वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आरोपीचा मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. त्यांना अद्यापर्यंत यश आलेले नाही. मोबाईलबाबत आरोप दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याची शक्यता पोलीस अधिकारी व्यक्त करत आहेत.





