पुणे | स्वारगेट बसस्थानक पाण्याखाली

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- शहरात थोडा जोरात पाऊस झाला, की स्वारगेट स्थानक पाण्याखाली गेले समजायचे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात जाताना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, एसटी प्रशासनाकडून कधीच त्यावर उपाययोजना केली जात नाही. केवळ “निधी आहे, लवकरच काम केले जाईल’ असे सांगून वेळ मारून नेतात. मात्र, निधी आहे तर गेला कुठे असा प्रश्नही उपस्थित होतो.
पुणे शहरातील स्वारगेट हे महत्त्वाचे एसटी स्थानक आहे. या ठिकाणाहून मुंबईसह राज्याच्या विविध भागांत एसटी बस धावतात. प्रत्येक वर्षी शहरात मोठा पाऊस झाला की स्वारगेट स्थानकात पाणी साचते. त्यामुळे प्रवाशांना कसरत करत तेथून जावे लागते. प्रवाशांकडे बॅग असतील, तर त्यांना मोठीच कसरत करत जावे लागते. पाण्याचा निचरा होण्यास बराच वेळ लागतो.
त्यामुळे सोलापूर रस्त्याच्या बाजूने आतमध्ये जाणे शक्य होत नाही. तसेच, एसटी स्थानक परिसरात अनेक खड्डे आहेत. त्यामध्ये पाणी साचल्यामुळे प्रवाशांना त्रास होते. पण, एसटी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. याकडे स्वारगेट एसटी स्थानक आगार प्रमुख व पुणे विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.





